इय्योब 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)आपल्या परिस्थितीविषयी ईयोबाचे गार्हाणे 1 “माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे; मी आपले गार्हाणे एकसारखे चालू ठेवीन; माझ्या जिवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन. 2 मी देवाला म्हणेन, मला दोषी लेखू नकोस; तू माझ्याशी विरोध का करतोस हे मला सांग. 3 तू मला छळतोस; आपल्या हातच्या घडलेल्या वस्तूस तुच्छ लेखून दुष्टांच्या मसलतीला प्रसन्न होतोस, हे तुला उचित वाटते काय? 4 तुला चर्मचक्षू आहेत काय? तुझी दृष्टी मर्त्य मानवाच्या दृष्टीसारखी आहे काय? 5 तुझे दिवस मर्त्य मानवाच्या दिवसासारखे, तुझी वर्षे मनुष्याच्या वर्षांसारखी आहेत; 6 म्हणून तू माझा अधर्म शोधतोस व माझे पाप हुडकतोस काय? 7 तुला तर ठाऊक आहेच, की मी दुष्ट नाही. तुझ्या हातून सोडवणारा कोणी नाही. 8 तुझ्या हातांनी मला घडवले आहे, त्यांनी सर्वतोपरी मला बनवले आहे, तरी तू माझा नाश करीत आहेस. 9 तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण; तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय? 10 तू मला दुधासारखे ओतून दह्यासारखे विरजवले नाहीस काय? 11 त्वचा व मांस ह्यांचे पांघरूण तू मला घातलेस, अस्थी व स्नायू जोडून मला बनवलेस. 12 तू मला जीवन दिलेस व माझ्यावर प्रसाद केलास, तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहिला. 13 तरी तू आपला हा उद्देश मनात लपवून ठेवलास; तुझ्या मनात काय होते ते आता मला समजले; 14 मी पाप केले तर ते ध्यानात ठेवून माझ्या अधर्माची तू मला माफी करणार नाहीस; 15 मी दुष्ट झालो तर हायहाय करावी लागेल. मी नीतिमान झालो तरी लज्जेने व्याप्त होऊन व माझी विपत्ती पाहून मी आपले डोके वर करणार नाही. 16 माझे डोके वर झाले की तू सिंहासारखा माझ्या पाठीस लागणार; तुझ्या अद्भुत शक्तीचा माझ्यावर पुन्हा पुन्हा प्रयोग करणार. 17 तू माझ्याविरुद्ध आपले नवेनवे साक्षीदार आणणार; तू माझ्यावरचा आपला क्रोध वृद्धिंगत करणार; तू माझ्यावर सैन्यामागून सैन्य पाठवणार. 18 तू मला मातेच्या उदरातून का बाहेर आणलेस? बाहेर आणले नसते तर मी प्राणास अंतरलो असतो, कोणाच्या दृष्टीस मी पडलो नसतो. 19 मी जन्माला येऊन न आल्यासारखा झालो असतो; मी गर्भावस्थेतूनच कबरेत गेलो असतो; 20 माझे दिवस थोडे नाहीत काय? तर मला सोड, माझ्यावरची आपली दृष्टी काढ. म्हणजे माझ्या मनाला थोडे चैन पडेल; 21 मग जेथून परत येणे नाही अशा अंधाराच्या, मृत्यूच्या प्रदेशात मी जाईन; 22 जेथे काळोख, निबिड अंधकार आहे, अशा मृत्युच्छायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन; तेथला प्रकाश अंधकारच होय.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India