यिर्मया 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)यरुशलेम व यहूदा ह्यांचा र्हास 1 बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे. 2 सुंदर व सुकुमार अशा त्या सीयोनकन्येचा मी उच्छेद करीन. 3 मेंढपाळ आपले कळप घेऊन तिच्याकडे येतील, तिच्या आसपास आपले तंबू ठोकतील, त्यांच्यातला प्रत्येक आपापल्या स्थानी चरेल. 4 “तिच्याशी लढण्याची तयारी करा; उठा, आपण दुपारी चढाई करू. हाय हाय! दिवस कलला आहे, संध्याकाळची छाया वाढत आहे.” 5 “उठा, आपण रात्री चढाई करून तिच्या वाड्यांचा नाश करू.” 6 कारण सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे की : “झाडे तोडून यरुशलेमेसमोर मोर्चा रचा. पारिपत्य करायचे ते ह्याच नगराचे; त्याच्यात जुलूमच जुलूम माजला आहे. 7 झर्यांतून जसे नित्य नवे पाणी येते तशी त्यात नित्य नवी दुष्टता घडते; त्याच्या ठायी बलात्कार व लुटालूट ह्यांचा गोंगाट ऐकू येतो; नित्य माझ्यासमोर रोग आणि जखमा आहेत. 8 यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.” 9 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “द्राक्षलतांचा सरवा काढतात तसा अवशिष्ट इस्राएलाचा सरवा साफ काढून नेतील; द्राक्षे खुडणार्यांप्रमाणे तू आपला हात डाहळ्यांना घाल.” 10 मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही. 11 ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील. 12 त्यांची घरे, शेते व स्त्रिया ही सर्व दुसर्यांच्या हाती जातील; मी आपला हात देशाच्या रहिवाशांवर उगारीन,” असे परमेश्वर म्हणतो. 13 “कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात. 14 शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात. 15 त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो. 16 परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’ 17 मी तुमच्यावर पहारेकरी ठेवून तुम्हांला म्हटले, ‘रणशिंगाचा शब्द ऐका;’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत नाही.’ 18 ह्याकरता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; जमलेले लोकहो, त्यांचे काय होते ते समजून घ्या. 19 अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे. 20 शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत. 21 ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’ 22 परमेश्वर असे म्हणतो की : “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे. 23 ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.” 24 आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत. 25 मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे. 26 माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल. 27 “तू त्याचा मार्ग जाणावा व पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकांत पारख करणारा1 व दुर्ग असे ठेवले आहे. 28 ते सर्व फितुर्यांतले फितुरी आहेत, ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात; ते पितळ व लोखंड आहेत, त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे. 29 भाता फुंक फुंक फुंकला आहे, शिसे जळून खाक झाले आहे; ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही. 30 त्यांना टाकाऊ रुपे म्हणतील, कारण परमेश्वराने त्यांना टाकले आहे.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India