यिर्मया 50 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)बाबेलविषयी भविष्य 1 बाबेलविषयी : खास्द्यांच्या देशाविषयी परमेश्वर जे वचन यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला ते हे : 2 “राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’ 3 कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत. 4 परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत, त्या काळी इस्राएल लोक येतील, ते व यहूदाचे लोक जमून येतील; ते वाटेने रडत येतील, परमेश्वर आपला देव ह्याला शरण येतील. 5 ते सीयोनाची वाट विचारतील, आपली तोंडे इकडल्या रस्त्यांकडे करून म्हणतील, ‘चला, शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाफ करू.’ 6 माझे लोक चुकार मेंढरांच्या कळपासारखे झाले आहेत; त्यांच्या मेंढपाळांनी त्यांना भ्रांत केले आहे, डोंगरांवर त्यांना बहकवले आहे; ते पहाडापहाडांतून भटकले आहेत; ते आपले विश्रांतिस्थान विसरले आहेत. 7 ज्यांना ते सापडले त्यांनी त्या सर्वांना खाऊन टाकले; त्यांचे शत्रू म्हणाले, ‘ह्याबद्दल आम्हांला काही दोष नाही, कारण परमेश्वर, जो न्यायाचे वसतिस्थान, जो त्यांच्या पूर्वजांचा आशाकंद त्याच्याविरुद्ध त्यांनी पातक केले आहे.’ 8 बाबेलातून पळून जा, खास्द्यांच्या देशातून निघून जा; कळपाच्या पुढे चालणार्या एडक्यांसारखे व्हा. 9 कारण पाहा, मी उत्तर देशाहून मोठ्या राष्ट्रांचा जमाव उठवून बाबेलवर आणीन; ते त्याच्याविरुद्ध सज्ज होतील; त्याच दिशेकडून तो हस्तगत होईल; रिकामा परत येत नाही अशा चतुर वीराच्या बाणांप्रमाणे त्यांचे बाण आहेत. 10 ते खास्द्यांचा देश लुटतील; त्याला लुटणारे सर्व तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो. 11 माझे वतन लुटणार्यांनो, तुम्ही जरी हर्ष व उल्लास करीत आहात, मळणी करणार्या कालवडीप्रमाणे बागडत आहात, मजबूत घोड्यांप्रमाणे खिंकाळत आहात, 12 तरी तुमची माता अत्यंत ओशाळी होईल; तुमची जन्मदात्री लाजेल; पाहा, ते अगदी कनिष्ठ राष्ट्र, वैराण जंगल व शुष्क भूमी होईल. 13 परमेश्वराच्या संतापामुळे ते निर्जन होईल, ते अगदी ओसाड होईल; प्रत्येक येणाराजाणारा बाबेलविषयी विस्मित होईल व त्याच्या सर्व क्लेशांस्तव त्याचा उपहास करील. 14 अहो सर्व धनुर्धार्यांनो, बाबेलच्या सभोवती युद्धास उभे राहा; त्याला बाण मारा, एकही बाण राखून ठेवू नका; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. 15 त्याच्यावर चोहोकडून रणघोष करा, त्याने हार खाल्ली आहे; त्याची तटबंदी पडली आहे, त्याचे कोट पाडले आहेत. कारण हा परमेश्वराकडून सूड आहे : त्याच्यावर सूड उगवून घ्या, त्याने केले तसे त्याला करा. 16 बाबेलातला पेरणारा, कापणीच्या वेळी विळा चालवणारा नाहीसा करा; जोरदार तलवारीपुढे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे वळेल, प्रत्येक जण स्वदेशाकडे धाव घेईल. 17 “इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर. 18 ह्याकरता सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी अश्शूराच्या राजाचा समाचार घेतला तसा बाबेलच्या राजाचा व त्याच्या देशाचा समाचार घेईन. 19 मी इस्राएलास त्याच्या कुरणात परत आणीन, तो कर्मेल व बाशान ह्यांवर चरेल, एफ्राइमाच्या डोंगरावर व गिलादात त्याचा जीव तृप्त होईल. 20 त्या दिवसांत, त्या काळी, लोक इस्राएलाचे दुष्कर्म शोधतील, पण ते नसणार; यहूदाची पातके शोधतील पण त्यांना ती सापडायची नाहीत; कारण ज्यांना मी वाचवून ठेवीन त्यांना मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो. 21 मराथाईम (अत्यंत बंडखोर देश) ह्यावर चढाई कर, आणि पकोडच्या (समाचार घ्यायच्या देशाच्या) रहिवाशांवर चढाई कर; त्यांची नासधूस कर, त्यांच्या पाठीस लागून त्यांचा समूळ नाश कर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही कर. 22 देशात युद्धध्वनी होत आहे, मोठा नाश होत आहे. 23 हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडूनतोडून टाकला आहे! बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे! 24 हे बाबेला, मी तुझ्यासाठी सापळा मांडला व तू सापडला आहेस, पण तुला कळले नाही; तू सापडलास व तुला पकडलेही, कारण तू परमेश्वराविरुद्ध भांडलास. 25 परमेश्वराने आपले शस्त्रागार उघडले आहे, त्यातून त्याने आपल्या क्रोधाची हत्यारे बाहेर काढली आहेत; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याला खास्द्यांच्या देशात कार्य करायचे आहे. 26 तुम्ही सर्व चोहोकडून त्याच्यावर चढाई करा; त्याची भांडारे उघडा; त्याचे ढीग करा; त्याचा विध्वंस करा; त्याचे काही शिल्लक राहू देऊ नका. 27 त्याचे सर्व वीर मारून टाका; त्यांना वधस्थली जाऊ द्या; त्यांना धिक्कार असो! कारण त्यांचा दिवस, त्यांच्या समाचाराची वेळ आली आहे. 28 बाबेल देशातून जे पळून निभावून जात आहेत त्यांचा ध्वनी ऐका; तो ध्वनी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडून सूड, त्याच्या मंदिराविषयीचा सूड, सीयोनास कळवत आहे. 29 बाबेलवर तिरंदाज, सर्व धनुर्धारी ह्यांना जमवा; त्याच्या सभोवती तळ द्या; त्याचा काही निभाव लागू देऊ नका; त्याच्या कृतीप्रमाणे त्याला प्रतिफळ द्या; जे सर्व त्याने केले तसे त्याला करा; कारण त्याने परमेश्वराविरुद्ध, इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरुद्ध तोरा मिरवला आहे. 30 ह्यामुळे त्यांचे तरुण त्याच्या चवाठ्यावर पडतील, त्याचे सर्व वीर त्या दिवशी स्तब्ध होतील, असे परमेश्वर म्हणतो. 31 हे गर्विष्ठा! पाहा, मी तुझ्याविरुद्ध आहे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो; कारण तुझा दिवस, मी तुझा समाचार घेण्याची वेळ आली आहे. 32 गर्विष्ठ ठोकर खाऊन पडेल, त्याला कोणी उचलणार नाही; मी त्याच्या नगरांना आग लावून देईन, ती त्याच्याभोवतालचे सर्वकाही खाऊन टाकील. 33 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्राएल लोक व यहूदा लोक ह्यांच्यावर बरोबरच जुलूम होत आहे; ज्या सर्वांनी त्यांना बंदिवान करून नेले त्यांनी त्यांना धरून ठेवले; ते त्यांना मोकळे सोडीनात. 34 त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. तो त्यांच्या पक्षाने लढेलच, म्हणजे मग तो पृथ्वीला विसावा देईल, पण बाबेलच्या रहिवाशांना घाबरे करील. 35 परमेश्वर म्हणतो, खास्द्यांवर तलवार उपसली आहे; आणि ती बाबेलचे रहिवासी, तिचे सरदार व तिचे ज्ञानी ह्यांच्यावर उपसली आहे. 36 वाचाळांवर तलवार उपसली आहे; ते वेडे बनतील, त्याच्या वीरांवर तलवार उपसली आहे; ते फजीत होतील. 37 त्याच्या घोड्यांवर, त्याच्या रथांवर व त्यांच्यात राहणार्या सर्व मिश्र जातींवर तलवार उपसली आहे, ते स्त्रिया बनतील! त्याच्या निधींवर तलवार उपसली आहे, ते लुटीस जातील! 38 त्याच्या जलप्रवाहांना झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातील लोकांना मूर्तींचे वेड लागले आहे. 39 ह्यास्तव वनपशू रानकुत्र्यांसह तेथे राहतील, शहामृग तेथे राहतील; तेथे कधीही वस्ती होणार नाही; पिढ्यानपिढ्या तेथे कोणी वस्ती करणार नाही. 40 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्या आसपासची नगरे ह्यांचा देवाने समूळ नाश केला, तसाच तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्हाड करणार नाही. 41 पाहा, उत्तरेकडून एक राष्ट्र, मोठे राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून बहुत राजे उठत आहेत. 42 ते धनुष्य व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही; ते सागराप्रमाणे गर्जना करतात, ते घोड्यांवर स्वार झाले आहेत. हे बाबेलकन्ये, ते युद्धास सिद्ध झाल्याप्रमाणे तुझ्यावर येत आहेत. 43 त्यांचा लौकिक बाबेलच्या राजाने ऐकला आहे, त्याचे हात गळाले आहेत; प्रसवणार्या स्त्रीप्रमाणे क्लेश आणि कळा त्याला लागल्या आहेत. 44 पाहा, यार्देनेच्या घोर अरण्यातून जसा सिंह तसा तो त्या मजबूत वस्तीवर येईल; पण मी त्यांना त्या वस्तीपासून एका क्षणात पळवीन; ज्याला निवडतील त्याला तिच्यावर नेमीन; कारण माझ्यासमान कोण आहे? मला न्यायसभेसमोर कोण आणील? कोणता मेंढपाळ माझ्यासमोर उभा राहील? 45 ह्यामुळे परमेश्वराने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प व खास्द्यांच्या देशाविरुद्ध केलेल्या योजना ऐकून घ्या; ते त्यांना, कळपातील लहानांनादेखील निश्चये ओढत नेतील; त्यांची वस्ती खातरीने त्यांच्यामुळे विस्मय पावेल. 46 बाबेल घेण्याच्या वेळी झालेल्या आवाजाने पृथ्वी कापत आहे, तिचा आवाज राष्ट्रांमध्ये ऐकू येत आहे.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India