यिर्मया 24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)चांगल्या आणि वाईट अंजिरांवरून धडा 1 यहोयाकीम ह्याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा त्याला व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार ह्यांना नबुखद्रेस्सराने धरून यरुशलेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखवले; पाहा, परमेश्वराने मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या. 2 एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते; दुसर्या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते. 3 परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “अंजीर; चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खाण्याजोगे नाहीत.” 4 मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, 5 “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ह्या ठिकाणाहून यहूदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खास्द्यांच्या देशात पाठवले आहेत त्यांना ह्या चांगल्या अंजिरांप्रमाणे मी समजेन. 6 मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही. 7 मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील. 8 परमेश्वर खरोखर म्हणतो, खाण्याजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्यांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार, आणि ह्या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुशलेमेचे अवशिष्ट लोक ह्यांचे मी करीन. 9 पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील. 10 आणि मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन, अशी की जो देश मी त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यातून त्यांचा नायनाट होईल.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India