Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यिर्मया 12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


यिर्मयाची तक्रार व देवाचे उत्तर

1 हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?

2 तू त्यांना लावले आहेस, त्यांनी मूळ धरले आहे; ते वाढून त्यांना फळे येतात; तू त्यांच्याजवळ त्यांच्या मुखात असतोस पण त्यांच्या अंतर्यामापासून तू दूर असतोस.

3 तथापि हे परमेश्वरा, तू मला जाणतोस, मला पाहतोस, तुझ्याविषयी माझे हृदय कसे आहे हे तू पारखतोस; वधायला न्यायच्या मेंढरांसारखे त्यांना बाहेर काढ; वधाच्या दिवसासाठी त्यांना सिद्ध कर.

4 देशाने कोठवर शोक करावा? सर्व देशातली वनस्पती कोठवर सुकणार? त्यात वस्ती करणार्‍यांच्या दुष्टतेने पशुपक्षी नष्ट झाले आहेत, कारण ते म्हणतात, “आमचा अंत तो पाहणार नाही.”

5 “तू पायी चालणार्‍यांबरोबर धावताना थकलास तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? शांततेच्या देशात तू निर्भय आहेस पण यार्देनेच्या घोर अरण्यात1 तू काय करशील?

6 कारण तुझे भाऊबंद व तुझ्या बापाचे घराणे हीदेखील तुझ्याशी बेइमानपणे वागली आहेत; त्यांनीदेखील तुझ्यावर शब्दांचा भडिमार केला आहे; ती तुझ्याशी गोड बोलली तरी त्यांचा विश्वास धरू नकोस.”

7 “मी आपल्या घराचा त्याग केला आहे, मी आपले वतन टाकून दिले आहे; मी आपल्या प्राणप्रियेस तिच्या शत्रूंच्या हाती दिले आहे.

8 माझे वतन मला वनातल्या सिंहाप्रमाणे झाले आहे; तिने आपला शब्द माझ्याविरुद्ध उच्चारला आहे, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे.

9 माझे वतन मला चित्रविचित्र रंगांच्या गिधाडाप्रमाणे आहे काय? तिला गिधाडांनी घेरले काय? चला, वनांतले सर्व पशू जमवा, तिला खाऊन टाकण्यास त्यांना आणा.

10 बहुत मेंढपाळांनी माझ्या द्राक्षीच्या मळ्याची नासाडी केली आहे, त्यांनी माझे वतन पायाखाली तुडवले आहे, त्यांनी माझे रम्य वतन शुष्क जंगल केले आहे.

11 त्यांनी ते ओसाड केले आहे; ते ओसाड होऊन माझ्यापुढे विलाप करीत आहे; सगळा देश ओसाड झाला आहे, कारण कोणालाही त्याची पर्वा वाटली नाही.

12 रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.

13 त्यांनी गहू पेरला आणि कापणी काटेर्‍याची केली; त्यांनी कष्ट केले पण काही फायदा झाला नाही; परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा-संबंधाने फजिती होईल.”

14 माझे लोक इस्राएल ह्यांना मी दिलेल्या वतनास जे माझे दुष्ट शेजारी हात लावतात त्या सर्वांविरुद्ध परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी त्यांना त्यांच्या देशातून उपटून टाकीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून टाकीन.

15 तरी त्यांना उपटून टाकल्यावर मी त्यांच्यावर पुनरपि दया करीन, व त्यांच्यातल्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या वतनात व जमिनीत परत आणीन.

16 ते जर माझ्या लोकांच्या चालीरीती मन लावून शिकतील म्हणजे त्यांनी माझ्या लोकांना ज्याप्रमाणे बआलमूर्तीची शपथ घेण्यास शिकवले त्याप्रमाणे ‘परमेश्वराच्या जीविताची,’ ‘माझ्या नामाची शपथ’ वाहण्यास शिकतील तर ते माझ्या लोकांमध्ये वसतील.

17 पण ते माझे ऐकणार नाहीत तर असले राष्ट्र मी समूळ उपटून टाकीन; ते उपटून त्याचा नाश करीन, असे परमेश्वर म्हणतो.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan