यिर्मया 1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)यिर्मयाला पाचारण व त्याचे कार्य 1 बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने : 2 यहूदाचा राजा आमोनपुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. 3 तसेच यहूदाचा राजा योशीयापुत्र यहोयाकीम ह्याच्या काळापासून यहूदाचा राजा योशीयापुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजे पाचव्या महिन्यात यरुशलेमकरांना बंदिवान करून नेले तेथवर ते वचन आले. 4 परमेश्वराचे वचन मला आले ते असे : 5 “मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.” 6 तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” 7 मग परमेश्वर मला म्हणाला, “मी बाळ आहे असे म्हणू नकोस; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. 8 त्यांना तू भिऊ नकोस; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” 9 तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत; 10 पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.” 11 मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “यिर्मया तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या1 झाडाची डाहळी दिसते.” 12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.” 13 परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.” 14 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल. 15 कारण पाहा, मी उत्तरेकडल्या राष्ट्रांतील सर्व जाती बोलावत आहे, असे परमेश्वर म्हणतो; ते येऊन यरुशलेमेच्या वेशींपुढे, तिच्या सभोवार असलेल्या सर्व तटांपुढे व यहूदाच्या सर्व नगरांपुढे आपापली सिंहासने स्थापतील. 16 त्यांनी मला सोडले आहे, अन्य देवांपुढे धूप जाळला आहे व आपल्या हातच्या कृतींची पूजा केली आहे; त्यांच्या ह्या सर्व दुष्टतेबद्दल मी त्यांना शिक्षा फर्मावीन. 17 तू तर आपली कंबर कस; ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग; त्यांना घाबरू नकोस; घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन. 18 पाहा, आज ह्या सगळ्या देशांविरुद्ध, यहूदाचे राजे, त्याचे सरदार, त्याचे याजक व देशातील लोक ह्यांच्याविरुद्ध तुला मी तटबंदीचे नगर, लोहस्तंभ, पितळी कोट असे करतो. 19 ते तुझ्याबरोबर सामना करतील पण तुझ्यावर त्यांचा वरचष्मा होणार नाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India