Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

शास्ते 8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा एफ्राइमी पुरुष त्याला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागलास? तू मिद्यानाशी लढायला निघालास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” अशी ते त्याच्याशी हुज्जत घालू लागले.

2 तो त्यांना म्हणाला, “आता तुम्ही केले त्या मानाने मी काय केले? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या सबंध पिकापेक्षा चांगला नाही काय?

3 मिद्यानाचे सरदार ओरेब व जेब ह्यांना देवाने तुमच्या हाती दिले; तुम्ही केले त्या मानाने मला काय करता आले?” तो असे बोलला तेव्हा त्यांचा त्याच्यावरील राग शमला. गिदोन मिद्यानाचे राजे कैद करतो

4 गिदोन व त्याच्याबरोबरचे तीनशे लोक थकूनभागून गेले होते तरी ते तसेच पाठलाग करत यार्देनेवर येऊन पलीकडे गेले.

5 तेव्हा तो सुक्कोथ येथल्या लोकांना म्हणाला, “कृपया माझ्याबरोबरच्या लोकांना भाकरी द्या, कारण ते थकून गेले आहेत आणि मिद्यानाचे राजे जेबह व सलमुन्ना ह्यांचा मी पाठलाग करत आहे.”

6 सुक्कोथाचे सरदार म्हणाले, “जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय म्हणून आम्ही तुझ्या सैन्याला अन्न द्यावे?”

7 तेव्हा गिदोन म्हणाला, “ठीक तर, परमेश्वर जेबह व सलमुन्ना ह्यांना माझ्या हाती देईल तेव्हा रानातल्या काट्यांनी व काटेरी झुडपांनी मी तुमची चामडी लोळवीन.”

8 तेथून तो पनुएल येथे गेला; तेथल्या लोकांकडेही त्याने तीच मागणी केली, तेव्हा सुक्कोथाच्या लोकांप्रमाणेच पनुएलच्या लोकांनीही त्याला उत्तर दिले.

9 तो पनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुखरूप माघारी येईन तेव्हा हा बुरूज पाडून टाकीन.”

10 जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे पंधरा हजार सैन्य होते; पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते; कारण एक लक्ष वीस हजार धारकरी पुरुष पतन पावले होते.

11 नंतर नोबह व यागबहा ह्यांच्या पूर्वेस राहुट्यांत राहणार्‍या लोकांच्या वाटेने वर चालून सैन्य बेसावध असताना गिदोनाने त्याच्यावर हल्ला चढवला.

12 जेबह व सलमुन्ना हे पळाले तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग केला; त्याने जेबह व सलमुन्ना हे मिद्यानाचे दोन राजे पकडले आणि सर्व सैन्याची गाळण उडवली.

13 योवाशाचा मुलगा गिदोन हा हेरेस घाटावरून लढाईहून परत आला.

14 त्याने सुक्कोथातल्या एका तरुणाला धरून विचारले तेव्हा त्याने सुक्कोथातील सत्त्याहत्तर सरदार व वडील ह्यांची यादी त्याला लिहून दिली.

15 मग तो सुक्कोथातील लोकांकडे जाऊन म्हणाला, “तुम्ही माझी थट्टा केली होती ना की, जेबह व सलमुन्ना हे तुझ्या हाती आले आहेत की काय म्हणून आम्ही तुझ्या थकल्याभागल्या लोकांना अन्न द्यावे! तर हे बघा जेबह व सलमुन्ना.”

16 मग त्याने त्या नगराच्या वडील जनांना पकडले आणि रानातील काट्यांनी व काटेरी झुडपांनी त्या सुक्कोथाच्या लोकांना चांगलाच धडा शिकवला.

17 त्याने पनुएलचा बुरूज पाडून टाकला व त्या नगरातील पुरुषांना ठार मारले.

18 मग त्याने जेबह व सलमुन्ना ह्यांना विचारले, “तुम्ही ताबोर येथे ज्या पुरुषांचा वध केला ते कसे होते?” त्यांनी उत्तर दिले, “ते तुझ्यासारखेच होते. ते सगळे राजकुमारांसारखे होते.”

19 तेव्हा तो म्हणाला, “ते माझे भाऊ, माझे सहोदर होते; परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना जिवंत ठेवले असते तर मी तुम्हांला ठार मारले नसते.”

20 मग तो आपला ज्येष्ठ पुत्र येथेर ह्याला म्हणाला, “ऊठ, ह्यांना ठार कर.” पण त्या तरुणाने आपली तलवार उपसली नाही, कारण तो पोरसवदा असल्याने घाबरला.

21 तेव्हा जेबह व सलमुन्ना म्हणाले, “तूच उठून आमच्यावर प्रहार कर, पुरुषातच पुरुषार्थ असतो.” तेव्हा गिदोनाने उठून जेबह व सलमुन्ना ह्यांना ठार केले आणि त्यांच्या उंटांच्या गळ्यांतल्या चंद्रकोरी काढून घेतल्या.


गिदोनाची इतर कृत्ये आणि त्याचा मृत्यू

22 तेव्हा इस्राएल लोक गिदोनाला म्हणाले, “तुम्ही व तुमच्या पुत्रपौत्रांनीही आमच्यावर अधिकार गाजवावा, कारण तुम्ही आम्हांला मिद्यानांच्या तावडीतून सोडवले आहे.”

23 गिदोन त्यांना म्हणाला, “मी तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही; माझा मुलगाही तुमच्यावर अधिकार गाजवणार नाही. परमेश्वरच तुमच्यावर अधिकार गाजवील.”

24 गिदोन त्यांना पुढे म्हणाला, “तुमच्याकडे मला एक मागणी करायची आहे. तुम्ही प्रत्येकाने आपल्या लुटीतली कुंडले तेवढी मला द्यावीत.” (ते इश्माएली असल्यामुळे त्यांच्याजवळ सोन्याची कुंडले होती.)

25 ते म्हणाले, “ती आम्ही मोठ्या खुशीने देतो.” तेव्हा चादर पसरून त्यात प्रत्येकाने आपापल्या लुटीतील कुंडले टाकली.

26 त्याने मागून घेतलेल्या सोन्याच्या कुंडलांचे वजन सोन्याचे एक हजार सातशे शेकेल भरले. ह्यांखेरीज चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांच्या अंगावरली जांभळी वस्त्रे व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील साखळ्या वेगळ्याच होत्या.

27 गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्राएल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले; ते गिदोन व त्याचे घराणे ह्यांना पाश असे झाले.

28 अशा प्रकारे मिद्यान इस्राएल लोकांचा अंकित झाला. त्याने पुन्हा आपले डोके वर काढले नाही. गिदोनाच्या हयातीत म्हणजे चाळीस वर्षे देशाला शांतता लाभली.

29 योवाशाचा मुलगा यरुब्बाल हा आपल्या घरी जाऊन राहिला.

30 गिदोनाला स्वतःचे सत्तर मुलगे झाले, कारण त्याला पुष्कळ बायका होत्या.

31 शखेमात त्याची एक उपपत्नी होती; तिला त्याच्यापासून एक मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अबीमलेख असे ठेवले.

32 योवाशाचा मुलगा गिदोन हा चांगला म्हातारा होऊन मरण पावला आणि अबियेजेर्‍यांच्या अफ्रा येथे त्याचा बाप योवाश ह्याच्या कबरेत त्याला पुरण्यात आले.

33 गिदोन मरण पावल्यावर लोक पुन्हा फिरले आणि व्यभिचारी मतीने बआल देवाच्या नादी लागले; त्यांनी बआल-बरीथ1 ह्याला आपला देव केले.

34 इस्राएल लोकांचा देव परमेश्वर ज्याने त्यांना सभोवतालच्या सर्व शत्रूंच्या हातून सोडवले होते त्याची त्यांनी आठवण ठेवली नाही.

35 तसेच यरुब्बाल म्हणजे गिदोन ह्याने इस्राएलावर केलेले सगळे उपकार न स्मरता त्याच्या घराण्याबद्दल त्यांनी काही कृतज्ञता दर्शवली नाही.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan