Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

शास्ते 21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बन्यामीन वंशजांसाठी बायका

1 इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती की, “आपल्यांपैकी कोणीही बन्यामिन्यांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत.”

2 ते बेथेल येथे गेले आणि संध्याकाळपर्यंत देवासमोर बसून त्यांनी मोठ्याने रडून आकांत केला.

3 ते म्हणाले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आज इस्राएलाचा एक वंश कमी झाला आहे; असे का घडून यावे?”

4 दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून त्यांनी तेथे एक वेदी बांधली आणि होमबली व शांत्यर्पणे केली.

5 मग इस्राएल लोक विचारपूस करू लागले, इस्राएलाच्या कोणत्याही वंशांपैकी परमेश्वरासमोर भरलेल्या मेळाव्याला आले नव्हते असे कोणी आहेत काय? कारण त्यांनी गंभीर प्रतिज्ञा केली होती, की, “जे मिस्पा येथे परमेश्वरासमोर येणार नाहीत त्यांना अवश्य जिवे मारावे.”

6 आपला बंधू बन्यामीन ह्याच्या बाबतीत इस्राएल लोकांना पस्तावा झाला; कारण ते म्हणू लागले, “आज इस्राएलातून एका वंशाचा उच्छेद झाला आहे.

7 आपण तर परमेश्वराची शपथ वाहिली आहे, आपल्यापैकी कोणीही त्यांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत, तेव्हा त्यांतले जे उरले आहेत त्या प्रत्येकाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे बरे?”

8 त्यांनी विचारपूस केली, “मिस्पा येथे परमेश्वरासमोर आले नव्हते असे इस्राएल वंशांतले कोण आहेत?” तेव्हा त्यांना कळले की, याबेश-गिलादाहून त्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी कोणीही छावणीत आले नव्हते.

9 कारण लोकांची मोजदाद केली तेव्हा याबेश-गिलाद येथे राहणार्‍यांपैकी कोणीही तेथे हजर नव्हते असे आढळून आले होते.

10 तेव्हा मंडळीने शूर अशा बारा हजार लोकांना तिकडे पाठवले; त्यांनी त्यांना आज्ञा केली, “तुम्ही जाऊन याबेश-गिलादाच्या रहिवाशांचा बायकापोरांसह तलवारीने संहार करा.

11 तुम्ही करायची कामगिरी ही की, सर्व पुरुष आणि पुरुषांशी संबंध केलेल्या सर्व स्त्रिया ह्यांचा तुम्ही समूळ नाश करावा.”

12 पुरुषांशी संबंध न आलेल्या चारशे तरुण मुली याबेश-गिलाद येथील रहिवाशांत त्यांना आढळल्या. त्या त्यांनी कनान देशातील शिलो येथल्या छावणीत आणल्या.

13 नंतर रिम्मोन खडकाजवळ जे बन्यामिनी राहत होते. त्यांच्याकडे सर्व मंडळीने लोक पाठवून त्यांच्याशी तहाचे बोलणे केले.

14 तेव्हा बन्यामिनी परत आले आणि याबेश-गिलादातल्या स्त्रियांपैकी ज्या मुली वाचल्या होत्या त्या त्यांना बायका करून देण्यात आल्या, पण त्या त्यांना पुरल्या नाहीत.

15 परमेश्वराने इस्राएल वंशात तूट पाडली म्हणून लोक बन्यामिनाबाबत पस्तावा करू लागले.

16 मंडळीतील वडील जन विचारू लागले, “बन्यामिनी स्त्रियांचा नाश झाला असल्यामुळे उरलेल्या प्रत्येक बन्यामिनी माणसाला बायको मिळवून देण्याबाबत आपण काय करावे?”

17 लोक म्हणाले, “बन्यामिनाच्या वाचलेल्या लोकांना वतन दिले पाहिजे, म्हणजे इस्राएलातला एक वंश नामशेष होणार नाही.

18 त्यांना मुली देणे आपल्यापैकी कोणालाही शक्य नाही, कारण इस्राएल लोकांनी अशी प्रतिज्ञा केली आहे की, जो आपली मुलगी बन्यामिनाला देईल तो शापित होईल.”

19 मग ते म्हणाले, “शिलो नगरात दरवर्षी परमेश्वरासाठी उत्सव होत असतो; हे नगर बेथेलच्या उत्तरेस बेथेलाहून शखेमास जाणार्‍या हमरस्त्याच्या पूर्वेस आणि लबोनाच्या दक्षिणेस वसलेले आहे.”

20 आणि त्यांनी बन्यामिन्यांना आज्ञा केली, “तुम्ही जाऊन द्राक्षमळ्यात दबा धरून बसावे व पाळत ठेवावी.

21 आणि शिलोच्या मुली नृत्यासाठी बाहेर पडताच द्राक्षमळ्यातून बाहेर निघावे आणि त्यांच्यातल्या एकेकीला एकेकाने धरून बायको करण्यासाठी बन्यामीन देशात अथवा प्रांतात घेऊन जावे.

22 त्यांचे वडील अथवा भाऊबंद तुमच्याकडे गार्‍हाणे घेऊन आले तर तुम्ही त्यांना सांगा, कृपया त्या दान म्हणून आम्हांला ठेवून घेऊ द्या; कारण त्या आमच्यासाठी बायका म्हणून आम्ही युद्धात घेतल्या नाहीत आणि तुम्हीही त्या आम्हांला दिल्या नाहीत, म्हणून तुम्हांला दोष लागत नाही.”

23 त्याप्रमाणे बन्यामिनी लोकांनी केले; त्यांनी त्या नृत्य करणार्‍या मुलींतून आपल्या संख्येइतक्या मुली पकडून बायका करून घेतल्या. मग ते निघून आपल्या वतनाला परत गेले आणि नगरे वसवून त्यांत राहू लागले.

24 त्या वेळेस इस्राएल लोक तेथून निघून आपापल्या वंशाकडे व आपापल्या कुळांकडे गेले. जो तो आपापल्या वतनाला परत गेला.

25 त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता; ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan