शास्ते 20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)बन्यामीन वंशजांविरुद्ध युद्ध 1 मग दानापासून बैर-शेबापर्यंतचे सर्व इस्राएल लोक व गिलादातले लोक बाहेर पडले व त्यांची मंडळी एकत्र येऊन मिस्पा येथे परमेश्वरासमोर जमा झाली. 2 लोकांचे सर्व नायक आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतले सैनिक मिळून चार लक्ष धारकरी पायदळ देवाच्या प्रजेच्या मेळ्यात सामील झाले. 3 इस्राएल लोक मिस्पात जमा झाल्याची बातमी बन्यामिनी लोकांच्या कानी गेली. इस्राएल लोकांनी विचारले, “हे दुष्कृत्य कसे घडून आले, ते आम्हांला सांगा.” 4 त्या खून झालेल्या स्त्रीचा नवरा जो लेवी ह्याने उत्तर दिले, “मी आपल्या उपपत्नीबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात रात्री मुक्कामाला आलो. 5 आणि गिब्यातल्या लोकांनी रात्री घराला गराडा घातला; माझा खून करण्याचा त्यांचा बेत होता, आणि त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला व ती मेली. 6 तेव्हा मी माझ्या उपपत्नीला घरी आणून तिचे तुकडे केले आणि इस्राएलाच्या वतनांतील सर्व प्रांतात पाठवून दिले; कारण त्या लोकांनी इस्राएलामध्ये कामांध व निर्लज्ज कृत्य केले होते. 7 तर इस्राएल लोकहो, तुम्ही सर्व आता आपला अभिप्राय व मसलत द्या.” 8 तेव्हा सर्व लोक एकमताने उठले व एकमुखाने म्हणाले, “आपल्यापैकी कोणीही तंबूत जाणार नाही; आपल्यातल्या कोणीही परतायचे नाही. 9 आपण असे करू या : गिब्यावर कोणी हल्ला करायचा ते चिठ्ठ्या टाकून ठरवू. 10 मग सर्व इस्राएल वंशातील शंभर पुरुषांमागे दहा, हजारामागे शंभर, आणि दहा हजारांमागे एक हजार असे पुरुष निवडू; ते सैन्यासाठी भोजनसामग्री आणतील व आपण बन्यामिनाचे गिबा येथे जाऊन तेथील लोकांनी इस्राएलामध्ये जे निर्लज्ज कृत्य केले आहे त्याबद्दल त्यांचे पारिपत्य करू.” 11 अशा प्रकारे सर्व इस्राएल लोक एकजुटीने त्या नगरासमोर जमा झाले. 12 मग इस्राएल वंशांनी बन्यामिनाच्या सर्व वंशाकडे जासूद पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे कसले दुष्कृत्य घडले आहे? 13 गिब्यातील त्या बदमाशांना आमच्या हवाली करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारून इस्राएलातून ही दुष्टाई काढून टाकू.” पण बन्यामिनी लोक आपले भाऊबंद इस्राएल लोक ह्यांचे म्हणणे ऐकायला तयार होईनात. 14 ह्याउलट बन्यामिनी लोक आपापल्या नगरांतून बाहेर पडून इस्राएल लोकांशी लढण्यासाठी गिबा येथे जमा झाले. 15 त्या दिवशी गिब्यात राहणारे सातशे निवडक वीर सोडून निरनिराळ्या नगरांतून आलेल्या धारकरी बन्यामिन्यांची संख्या सव्वीस हजार होती. 16 त्या सर्व लोकांमध्ये सातशे निवडक पुरुष डावरे होते; त्यांच्या गोफणीचा नेम तसूभरदेखील चुकत नसे. 17 बन्यामीन सोडून बाकीच्या इस्राएल लोकांतले धारकरी पुरुष चार लक्ष भरले; हे सगळे लढवय्ये होते. 18 मग इस्राएल लोक निघून बेथेल येथे गेले आणि त्यांनी देवाला विचारले, “बन्यामिनी लोकांशी आमच्या वतीने लढण्यासाठी प्रथम कोणी चाल करून जावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “प्रथम यहूदाने जावे.” 19 इस्राएल लोकांनी पहाटेस उठून गिब्यासमोर तळ दिला. 20 इस्राएल लोक बन्यामिनाशी लढण्यासाठी बाहेर पडले. गिबा येथे त्यांच्याशी लढायला इस्राएल लोकांनी फळी उभारली. 21 तेव्हा बन्यामिनी लोक गिब्यातून बाहेर पडले आणि त्यांनी त्या दिवशी बावीस हजार इस्राएल पुरुष धुळीस मिळवले. 22 हे ऐकून इस्राएल पुरुषांनी हिंमत धरून जेथे पहिल्या दिवशी फळी उभारली होती तेथेच पुन्हा दुसरी फळी उभारली. 23 इस्राएल लोक जाऊन संध्याकाळपर्यंत परमेश्वरासमोर रडले; आणि “आपला बंधू बन्यामीन ह्याच्या लोकांशी लढायला पुन्हा जावे काय?” असे परमेश्वराला त्यांनी विचारले. तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “त्यांच्यावर चाल करून जा.” 24 दुसर्या दिवशी इस्राएल लोक बन्यामिनी लोकांशी सामना देण्यासाठी पुढे निघाले. 25 बन्यामिनी लोक दुसर्या दिवशी त्यांच्याशी सामना करायला गिब्याहून निघाले, आणि त्या दिवशीही त्यांनी इस्राएलाचे अठरा हजार लोक धुळीस मिळवले. ते सर्व धारकरी होते. 26 मग सर्व इस्राएल लोक मिळून बेथेल येथे जाऊन परमेश्वरापुढे रडत बसले; त्या दिवशी त्यांनी संध्याकाळपर्यंत उपवास केला आणि परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे केली. 27 ह्यानंतर इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्न केला. (कारण त्या दिवसांत देवाच्या कराराचा कोश तेथेच होता. 28 आणि अहरोनाचा नातू, एलाजाराचा मुलगा फिनहास हा त्या काळी त्या कोशाच्या सेवेस असे.) लोकांनी परमेश्वराला विचारले, “आमचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्याशी लढायला पुन्हा एकदा जावे काय? किंवा लढण्याचे सोडून द्यावे?” परमेश्वराने उत्तर दिले, “चाल करून जा; कारण उद्या मी त्यांना तुमच्या हाती देईन.” 29 नंतर इस्राएलाने गिब्याच्या सभोवती लोक दबा धरून बसवले. 30 तिसर्या दिवशी इस्राएल लोकांनी बन्यामिन्यांवर पुन्हा हल्ला केला आणि पूर्वीप्रमाणेच गिब्यासमोर फळी उभारली. 31 तेव्हा बन्यामिनी त्या लोकांशी सामना करायला बाहेर पडले; त्या वेळी इस्राएल लोकांनी त्यांना आपल्यामागे नगरापासून बरेच दूर झुलवत नेले; खुल्या मैदानातून एक हमरस्ता बेथेलास व दुसरा गिब्याकडे जातो, त्यांच्या दरम्यान पूर्वीप्रमाणेच बन्यामिन्यांनी हाणमार सुरू केली व इस्राएलांपैकी सुमारे तीस माणसे त्यांनी मारली. 32 बन्यामिनाचे लोक म्हणाले, “आता पहिल्याप्रमाणेच आपल्यासमोर त्यांचा मोड होत आहे.” पण इस्राएल लोक म्हणाले, “आपण पळण्याचे सोंग करून त्यांना नगरापासून दूर हमरस्त्यांपर्यंत झुलवत नेऊ.” 33 मग सर्व इस्राएल लोकांनी आपल्या जागा सोडून बाल-तामार येथे फळी उभारली, आणि गिब्याच्या परिसरात दबा धरून बसलेले इस्राएल लोक आपल्या ठिकाणावरून झपाट्याने पुढे धावले. 34 सर्व इस्राएलातले निवडक दहा हजार लोक गिब्यावर चालून आले व तेथे तुंबळ युद्ध जुंपले. आपल्यावर अनर्थ येऊन ठेपला आहे ह्याची बन्यामिन्यांना कल्पना नव्हती. 35 परमेश्वराने इस्राएलापुढे बन्यामिनाचा मोड केला; त्या दिवशी इस्राएल लोकांनी पंचवीस हजार एकशे बन्यामिनी लोकांचा संहार केला, ते सर्व धारकरी होते. 36 तेव्हा आपला मोड झाल्याचे बन्यामिन्यांच्या लक्षात आले. इस्राएल लोक बन्यामिन्यांपुढून मागे सरले, कारण गिब्याजवळ दबा धरून बसलेल्या लोकांवर त्यांची भिस्त होती. 37 दबा धरणार्यांनी त्वरा करून गिब्यावर छापा घातला आणि पुढे सरसावून सर्व नगराचा तलवारीने नाश केला. 38 इस्राएल लोक आणि दबा धरणारे ह्यांच्यामध्ये असा संकेत ठरला होता की, दबा धरणार्यांनी नगरात धूर करून त्याचा लोट वर चढेल असे करावे. 39 इस्राएल लोक लढाईत मागे सरू लागले तेव्हा बन्यामिन्यांनी हल्ला चढवून त्यांचे तीस लोक ठार केले. बन्यामिन्यांना वाटले की, पहिल्या लढाईप्रमाणेच आपल्यापुढे खरोखरच त्याचा मोड होत आहे; 40 इकडे नगरातून धुराचा लोट वर चढू लागला. बन्यामिनी मागे वळून पाहतात तर सगळ्या नगरात धूरच धूर होऊन आकाशाकडे त्याचा लोट चालला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. 41 इस्राएल लोक उलटले तेव्हा बन्यामिन्यांची गाळण उडाली. आपल्यावर संकट येऊन ठेपले आहे असे त्यांच्या लक्षात येऊन चुकले. 42 तेव्हा ते इस्राएल लोकांना पाठ दाखवून रानाकडे पळत सुटले; इस्राएल लोकांनी त्यांचा पिच्छा पुरवला; तसेच नगरातून बाहेर निघालेल्यांनी त्यांच्यामध्ये घुसून त्यांचा धुव्वा उडवला. 43 त्यांनी बन्यामिन्यांना घेरले व नोहा येथून1 त्यांच्या पाठीस लागून पूर्वेस गिब्यासमोर त्यांची धूळधाण केली. 44 बन्यामिनाचे अठरा हजार लोक पतन पावले. ते सर्व शूर वीर होते. 45 निसटलेले मात्र रिम्मोनाच्या खडकाकडे रानाच्या वाटेने पळून गेले. हमरस्त्यांवर गाठलेल्यांपैकी पाच हजार लोक इस्राएल लोकांनी टिपून मारले आणि गिदोमापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवून त्यांतले आणखी दोन हजार लोक मारले. 46 अशा प्रकारे बन्यामिनाचे पंचवीस हजार धारकरी लोक त्या दिवशी कामास आले; ते सर्व शूर वीर होते. 47 त्यांतले सहाशे लोक निसटून रानाच्या वाटेने रिम्मोन खडकावर पोहचले, तेथे ते चार महिने राहिले. 48 मग इस्राएल लोकांनी बन्यामिन्यांवर उलटून हाती लागलेली माणसे व जनावरे ह्यांचा संहार केला. तसेच जी गावे त्यांना आढळली ती सर्व आग लावून त्यांनी बेचिराख केली. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India