Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

शास्ते 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बोखीम येथे परमेश्वराचा दूत

1 परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;

2 तुम्ही ह्या देशाच्या रहिवाशांशी काही करारमदार करू नका; तुम्ही त्यांच्या वेद्या मोडून टाका, असे मी तुम्हांला म्हणालो होतो; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. तुम्ही हे काय केले?

3 म्हणून मीही म्हणालो, मी त्या लोकांना तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; ते तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हांला पाश होतील.”

4 परमेश्वराचा दूत सगळ्या इस्राएल लोकांना हे म्हणाला तेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला.

5 त्यांनी त्या स्थळाचे नाव बोखीम (आक्रोश करणारे) असे ठेवले. तेथे त्यांनी परमेश्वराला यज्ञ केले.


यहोशवाचा मृत्यू
( यहो. 24:29-31 )

6 यहोशवाने इस्राएल लोकांना निरोप दिला तेव्हा ते देशाचा ताबा घेण्यासाठी आपापल्या वतनावर गेले.

7 यहोशवाच्या हयातीत आणि यहोशवाच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांनी परमेश्वराने इस्राएलासाठी केलेली महान कार्ये पाहिली होती त्यांच्या हयातीत लोकांनी परमेश्वराची सेवा केली.

8 परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा एकशे दहा वर्षांचा होऊन मरण पावला.

9 एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली.

10 ती सर्व पिढी पूर्वजांस मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्राएलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. इस्राएलांची नीतिभ्रष्टता व शास्त्यांचा अंमल

11 इस्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवांची सेवा करू लागले.

12 आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांतील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेणेकरून त्यांनी परमेश्वराला चीड आणली.

13 परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोथ ह्यांची सेवा केली;

14 म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.

15 परमेश्वराने त्यांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे जेथे जेथे ते कूच करत तेथे तेथे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडून त्यांचे अहित होई आणि ते फार संकटात पडत.

16 मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणार्‍यांच्या हातून सोडवत;

17 तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही.

18 जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्यांच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून वाचवत असे; कारण त्यांच्यावर लोक जुलूम करत व त्यांना गांजत; ह्यामुळे ते कण्हत असत; म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई.

19 तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत; ते आपला दुराचार व दुराग्रह सोडत नसत.

20 तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही.

21 म्हणून यहोशवाच्या मृत्युसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मीदेखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही;

22 पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणेच ते चालतात की नाही हे पाहीन.”

23 म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही; त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan