Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

शास्ते 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


शमशोनाचा जन्म

1 इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले तेव्हा परमेश्वराने त्यांना चाळीस वर्षे पलिष्ट्यांचे अंकित केले.

2 त्या वेळी सरा गावी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांझ असून तिला मूलबाळ झाले नव्हते.

3 परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, “पाहा, तू वांझ असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल.

4 आता तू जपून राहा आणि द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस,

5 कारण पाहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; त्याच्या डोक्याला वस्तरा लावू नकोस, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल. आणि इस्राएलास पलिष्ट्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील.”

6 त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवर्‍याला सांगितले, “एक देवमाणूस माझ्याकडे आला, त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते; पण तो कोठून आला हे मी त्याला विचारले नाही व त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही.

7 तो मला म्हणाला, ‘पाहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल; ह्यापुढे तू द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस; कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाजीर राहील.”’

8 हे ऐकून मानोहाने परमेश्वराची विनवणी केली, “हे प्रभू, जो देवमाणूस तू आमच्याकडे पाठवला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणार्‍या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हांला शिकवावे असे कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे.”

9 देवाने मानोहाचे म्हणणे ऐकले. ती स्त्री शेतात बसली असताना देवदूत तिच्याकडे पुन्हा आला; पण तिचा नवरा मानोहा तिच्याबरोबर नव्हता.

10 म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन त्याला सांगितले, “त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे.”

11 मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले, “आपणच ह्या स्त्रीशी संभाषण केले होते काय?” तो म्हणाला, “होय मीच.”

12 मानोहा म्हणाला, “आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर ह्या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे?”

13 परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, “मी सांगितलेल्या सर्व गोष्टींना ह्या स्त्रीने जपावे.

14 द्राक्षवेलाचा कसलाही उपज तिने खाऊ नये; तिने द्राक्षारस किंवा मद्य पिऊ नये व कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये; मी केलेली आज्ञा तिने कसोशीने पाळावी.”

15 मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “आम्ही आपणासाठी एक करडू कापतो तेव्हा आपण अंमळ थांबावे अशी आमची विनंती आहे.”

16 परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, “तू थांबवलेस तरी मी तुझ्या हातचे खाणार नाही; तू होमबली केलास तर तो परमेश्वरासाठी केला पाहिजेस.” तो परमेश्वराचा दूत असल्याचे मानोहाला ठाऊक नव्हते.

17 मानोहाने परमेश्वराच्या दूताला विचारले, “आपले नाव काय? कारण आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून आल्यावर आम्ही आपला सन्मान करू.”

18 परमेश्वराच्या दूताने त्याला उत्तर दिले, “माझे नाव अगम्य आहे तेव्हा ते तू का विचारतोस?”

19 मग आश्‍चर्यकारक कृत्ये करणार्‍या परमेश्वराला मानोहाने अन्नार्पणासह एक करडू खडकावर अर्पण केले. त्याकडे मानोहा व त्याची बायको पाहत होती.

20 तेव्हा वेदीवरून स्वर्गाकडे ज्वाला उसळली आणि परमेश्वराच्या दूताने त्या वेदीवरल्या ज्वालेतून आरोहण केले. ते पाहून मानोहा व त्याची बायको ह्यांनी लोटांगण घातले.

21 परमेश्वराच्या दूताने मानोहाला व त्याच्या स्त्रीला पुन्हा दर्शन दिले नाही. तेव्हा तो परमेश्वराचा दूत होता हे मानोहाने ओळखले.

22 मानोहा आपल्या स्त्रीला म्हणाला, “आपण खात्रीने मरणार, कारण आपण देवाला पाहिले आहे.”

23 पण त्याची स्त्री त्याला म्हणाली, “आपल्याला मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर त्याने आपल्या हातून होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते, आपल्याला हे सगळे प्रकट केले नसते, आणि ह्या वेळी त्याने ह्या अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या नसत्या.”

24 पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला; तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता.

25 सरा व एष्टावोल ह्यांच्या दरम्यान महने-दान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan