याकोब 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)जीभ ताब्यात ठेवणे 1 माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे. 2 कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. 3 घोड्यांनी आपल्या कह्यात राहावे म्हणून आपण त्यांच्या तोंडात लगाम घातला, तर त्यांचे सर्व शरीर आपण फिरवतो. 4 तारवेही पाहा, ती एवढी मोठी असतात व प्रचंड वार्याने लोटली जात असतात, तरी सुकाणदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानशा सुकाणाने फिरवली जातात. 5 तशीच जीभही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते! 6 जीभ ही आग आहे; ती अनीतीचे भुवन आहे; आपल्या अवयवांत सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे; ती सृष्टीचे चक्र पेटवणारी आणि नरकाने पेटवलेली अशी आहे. 7 श्वापदे, पक्षी, सरपटणारे प्राणी व समुद्रातील जीव ह्या प्रत्येकाचा स्वभाव मनुष्यस्वभावाला वश होत आहे, आणि झाला आहे; 8 परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही; ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. 9 तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. 10 एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. 11 झर्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? 12 माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खार्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. खोटे व खरे ज्ञान 13 तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. 14 पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. 15 हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे. 16 कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. 17 वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे. 18 पण शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India