Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 64 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहाहा! तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!

2 अग्नी जसा काड्याकुड्या जाळतो व पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंना आपले नाम प्रकट करण्यासाठी उतरला असतास;

3 तू अनपेक्षित भयप्रद कृत्ये करीत असता तुझ्या दर्शनाने राष्ट्रे थरथर कापली असती तर बरे होते!

4 हे देवा, तुझी आशा धरून राहणार्‍यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन कालापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नाव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही.

5 जो आवडीने नीती आचरतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात, त्यांना तू भेट देतोस; पाहा, तू आमच्यावर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो; ह्या स्थितीत आम्ही बहुत काळ आहोत; तर आमचा उद्धार होईल काय?

6 आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.

7 तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस.

8 तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत.

9 हे परमेश्वरा, फार कोपू नकोस, आमचा अधर्म सदा स्मरू नकोस, पाहा, दृष्टी लाव, आम्ही तुला विनवतो, आम्ही सर्व तुझी प्रजा आहोत!

10 तुझी पवित्र नगरे वने बनली आहेत; सीयोन रान बनली आहे; यरुशलेम ओसाड झाली आहे.

11 आमचे पूर्वज ज्या आमच्या पवित्र व सुशोभित मंदिरात तुला स्तवीत, ते अग्नीचे भक्ष्य झाले आहे, आणि आमच्या सगळ्या मनोरम वस्तू नष्ट झाल्या आहेत.

12 हे परमेश्वरा, हे पाहून तू आपल्याला आवरशील काय? तू स्तब्ध राहून आम्हांला अशा दुर्धर पीडेत राहू देशील काय?

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan