यशायाह 62 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सीयोनेची नीतिमत्ता उदयप्रभेप्रमाणे फाकेपर्यंत तिच्याकरिता मी मौन धरणार नाही, यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालींप्रमाणे दिसेपर्यंत तिच्याकरिता मला चैन पडणार नाही. 2 राष्ट्रे तुझी नीतिमत्ता पाहतील, सर्व राजे तुझे वैभव पाहतील; परमेश्वराच्या मुखाने ठेवलेल्या नव्या नावाने तुला हाक मारतील. 3 तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील. 4 ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल. 5 कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. 6 हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमले आहेत; ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत; अहो परमेश्वराला स्मरण देणार्यांनो, तुम्ही स्वस्थ राहू नका; 7 आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका. 8 परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत; 9 तर ज्यांनी ते धान्य कोठारात साठवले तेच ते खातील व परमेश्वराचे स्तवन करतील; ज्यांनी तो द्राक्षारस साठवला तेच माझ्या पवित्र मंदिराच्या अंगणात तो पितील.” 10 बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा. 11 पाहा, परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजवले आहे की, “सीयोनेच्या कन्येला म्हणा, ‘पाहा, तुझे तारण येत आहे; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे व पारिपत्य त्याच्यासमोर आहे.”’ 12 पवित्र लोक, परमेश्वराने उद्धरलेले लोक, असे त्यांना म्हणतील व तू निगा केलेली व न टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India