Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सीयोनेचे भावी ऐश्वर्य

1 ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.

2 पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे.

3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.

4 तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत.

5 हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल.

6 उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील.

7 केदारचे सर्व कळप तुझ्याजवळ एकत्र होत आहेत; नबायोथचे एडके तुझ्या कामी येतील; ते मला पसंत पडून माझ्या वेदीवर चढतील, आणि मी आपल्या सुंदर मंदिराची शोभा वाढवीन.

8 जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण?

9 खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्यारुप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे.

10 परदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करत आहेत; कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडन केले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे.

11 राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, त्यांचे राजे तुझ्याकडे मिरवत आणावेत म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत.

12 कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उद्ध्वस्त होतील.

13 माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.

14 तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.

15 तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.

16 तू राष्ट्रांचे दूध शोषून घेशील, राजांचे स्तन तू चोखशील, आणि मी परमेश्वर तुला तारणकर्ता, उद्धारकर्ता याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे तू जाणशील.

17 मी तांब्याच्या जागी सोने, लोखंडाच्या जागी रुपे आणीन; लाकडांच्या जागी तांबे व दगडांच्या जागी लोखंड आणीन; तुझ्यावर शांती सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील, असे मी करीन.

18 ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.

19 ह्यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, रात्री प्रकाश देण्यास तुला चंद्राची गरज लागणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझा देव तुझे तेज होईल.

20 तुझ्या सूर्याचा ह्यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल; तुझे शोकाचे दिवस संपले आहेत,

21 तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,

22 जो सर्वांत लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan