Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 59 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


राष्ट्रव्यापी दुष्टाईची कबुली

1 पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.

2 तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही.

3 कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत; तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते.

4 न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.

5 ते नागाची अंडी उबवतात, कातिणीचे जाळे विणतात; त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एखादे चिरडले तर त्यातून फुरसे निघते.

6 त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वत:स झाकता येत नाही; त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात.

7 त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात; निर्दोष रक्तपात करण्यास त्वरा करतात; त्यांच्या कल्पना अधर्माच्या असतात; त्यांच्या मार्गात नाश व विध्वंस असतात.

8 शांतीचा मार्ग त्यांना ठाऊक नाही; त्यांच्या मार्गात न्याय नाही; ते आपणांसाठी वाकडे मार्ग करतात; त्या मार्गांनी चालणार्‍या कोणालाही शांती ठाऊक नाही.

9 म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.

10 आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.

11 आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;

12 कारण आमचे अपराध तुझ्यासमोर बहुत आहेत; आमची पातके आमच्याविरुद्ध साक्ष देतात; आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमची दुष्कृत्ये आम्हांला ठाऊक आहेत.

13 नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.

14 न्यायाला मागे ढकलले आहे. नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे; कारण चव्हाठ्यांवर सत्य अडखळून पडले आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही.

15 सत्याचा अगदी अभाव झाला आहे; दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतराजी झाली.

16 कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला; तेव्हा त्याच्याच बाहूने त्याला साहाय्य केले, त्याच्या न्याय्यत्वाने त्याला आधार दिला.

17 त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले; सूडरूपी पेहराव तो ल्याला. आवेशरूप झग्याने आपले अंग त्याने झाकले.

18 ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्‍यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.

19 ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील.

20 “तो सीयोनेकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्यांच्याकडे उद्धारकर्ता म्हणून येईल,” असे परमेश्वर म्हणतो.

21 परमेश्वर म्हणतो, “माझा तर त्यांच्याशी हाच करार : तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या मुखातून, तुझ्या संतानांच्या मुखांतून व तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखांतून आतापासून पुढे सर्वकाळ निघून जाणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan