Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 56 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


देवाचा करार पाळण्याबद्दल मिळणारे पारितोषिक

1 परमेश्वर म्हणतो, “न्यायाचे पालन करा, नीतीचे आचरण करा; कारण माझे तारण जवळ आले आहे. माझे न्याय्यत्व प्रकट होण्यास आले आहे.

2 जो मानव हे करतो व जो मानवपुत्र ह्याला धरून राहतो, जो शब्बाथ पाळतो, काही अपवित्र करीत नाही, जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरतो तो धन्य!”

3 जो विदेशी परमेश्वरचरणी जडला आहे तो असे न म्हणो की, “परमेश्वर आपल्या लोकांतून माझा उच्छेद करील;” आणि षंढही न म्हणो की, “मी केवळ शुष्क वृक्ष आहे.”

4 कारण परमेश्वर म्हणतो, “जे षंढ माझे शब्बाथ पाळतात, मला आवडणार्‍या गोष्टी पसंत करतात व माझ्या करारास दृढ धरून राहतात,

5 त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.

6 तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात,

7 त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.

8 घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्‍या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”


मूर्तिपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध

9 रानातील सर्व पशूंनो, वनातील सर्व पशूंनो, या, खाऊन टाकण्यास या.

10 त्याचे जागल्ये आंधळे आहेत, ते सगळे ज्ञानशून्य आहेत; ते सगळे मुके कुत्रे आहेत, त्यांना भुंकता येत नाही; ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत.

11 ते अधाशी कुत्रे आहेत; त्यांना तृप्ती कशी ती ठाऊक नाही; ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहेत; चोहोकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एकंदर आपापल्या मार्गास लागले आहेत.

12 ते म्हणतात, “चला, या, मी द्राक्षारस घेऊन येतो; आपण मद्याने मस्त होऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, तो अतिशय चैनीचा होईल.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan