Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 55 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सर्वांना दयेची मोफत देणगी

1 “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैशावाचून व मोलावाचून द्राक्षा-रसाचा व दुधाचा सौदा करा!

2 जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.

3 कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.

4 पाहा, मी त्याला राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमले आहे

5 पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.

6 परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;

7 दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.

8 कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.

9 कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.

10 पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्‍यास बीज, खाणार्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत,

11 त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.

12 तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल; पर्वत व टेकड्या तुमच्यापुढे जयघोष करतील; वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.

13 काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan