Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


नव्या गोष्टींसंबंधी भाकीत

1 हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.

2 ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.

3 “मी मागेच पूर्वीच्या गोष्टी सांगितल्या, माझ्या मुखातून त्या निघाल्या, मी त्या कळवल्या; मी त्या अकस्मात करू लागलो, आणि त्या घडून आल्या.

4 तू हट्टी आहेस, तुझ्या मानेचे स्नायू जसे काय लोखंड व तुझे कपाळ जसे काय पितळ आहे हे मला ठाऊक होते.

5 म्हणून हे बहुत काळापूर्वीच तुला कळवले. ते घडण्यापूर्वीच तुला विदित केले; नाहीतर तू म्हणाला असतास की ‘माझ्या मूर्तीने ते केले; माझ्या कोरीव मूर्तीच्या आज्ञेने व माझ्या ओतीव मूर्तीच्या आज्ञेने ते झाले.’

6 तू हे ऐकले आहेस, हे सर्व पाहा, तुम्हांला हे कबूल करायला नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुला माहीत नाहीत अशा गोष्टी तुला ऐकवतो.

7 त्या आताच उद्भवल्या, फार मागे नाहीत; त्या तुला आजपर्यंत ठाऊक नव्हत्या, नाही तर तू म्हणतास, ‘पाहा, त्या मला आधीच ठाऊक होत्या.’

8 तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणल्या नव्हत्या; प्राचीन काळापासून तुझे कान उघडले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस; गर्भवासापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते.

9 माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले.

10 मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे.

11 माझ्या, केवळ माझ्याचप्रीत्यर्थ हे मी करतो; माझ्या नामाची अप्रतिष्ठा का व्हावी? माझा गौरव मी इतरांना देत नाही.


परमेश्वर इस्राएलास मुक्त करील

12 हे याकोबा, मी बोलवलेल्या इस्राएला, माझे ऐक; मी तोच आहे; मी आदि आहे व अंतही आहे.

13 माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला; माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारले; मी हाक मारताच ती माझ्यापुढे एकत्र उभी राहतात.

14 तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका; त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळवल्या? परमेश्वराला प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील; तो आपले भुजबल खास्द्यांवर चालवील.

15 मी, केवळ मीच बोललो आहे; मी त्याला बोलावले आहे, त्याला आणले आहे. त्याचा आयुष्यक्रम सफल होईल.

16 तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे.

17 परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.

18 तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी नीतिमत्ता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती;

19 तुझा वंश रेतीइतका, तुझ्या पोटचे संतान रेतीच्या कणांइतके असते; त्याचे नाव माझ्यासमोरून उच्छेद पावले नसते, ते नष्ट झाले नसते.”

20 तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”

21 त्यांना त्याने रुक्ष भूमीवरून नेले, तेथे त्यांना तहान लागली नाही; त्यांच्यासाठी त्याने खडकातून पाणी वाहवले; त्याने खडक फोडला तो पाणी खळखळा वाहिले.

22 परमेश्वर म्हणतो, “दुर्जनांना शांती नसते.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan