Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बाबेलसंबंधी न्याय

1 अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.

2 जाते घेऊन धान्य दळ, आपला बुरखा मागे सार, वस्त्राचा घोळ उचलून धर, मांड्या उघड्या करून नदीनाल्यांतून पार चालत जा.

3 तुझी काया उघडी पडू दे; तुझी लज्जा दिसू दे; मी सूड घेईन, कोणाची गय करणार नाही.

4 आमच्या उद्धारकर्त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे आहे.

5 अगे खास्द्यांच्या कन्ये, गप्प बस, अंधारात जाऊन लप; कारण लोक ह्यापुढे तुला राज्यांची स्वामिनी म्हणणार नाहीत.

6 मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.

7 तू म्हणालीस, “मी सर्वकाळ स्वामिनी राहीन,” म्हणून तू ह्या गोष्टी ध्यानात धरल्या नाहीत, त्यांचा परिणाम लक्षात आणला नाही.

8 अगे विलासिनी, जी तू निश्‍चिंत बसतेस व मनात म्हणतेस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही, मी विधवा होणार नाही, अपत्यहीनतेचा अनुभव मला घडणार नाही,” ती तू हे ऐक :

9 अपत्यहीनता व वैधव्य ही दोन्ही एकाच दिवशी, एकाच क्षणी तुला प्राप्त होतील; तुझे बहुविध मंत्रतंत्र व तुझी विपुल चेटके ह्यांना न जुमानता ती तुझ्यावर पूर्णपणे गुदरतील.

10 कारण तू आपल्या दुष्टतेवर भिस्त ठेवलीस; तू म्हणालीस, “कोणी मला पाहत नाही;” तुझे शहाणपण व तुझे ज्ञान ह्यांनी तुला बहकवले म्हणून तू आपल्या मनात म्हणालीस, “मीच आहे, माझ्यावेगळी कोणी नाही.”

11 ह्यामुळे मंत्रतंत्रांनी निवारता येणार नाही अशी विपत्ती तुझ्यावर येईल; खंडणी देऊन टाळता येणार नाही असे अरिष्ट तुझ्यावर येईल; तुझ्या ध्यानीमनी नाही असा नाश तुला एकाएकी गाठील.

12 तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके, ज्यांचा जप तू तरुणपणापासून करून थकलीस, ती आता चालव; कदाचित त्याचा तुला उपयोग होईल, त्यांनी कदाचित तुझा धाक बसेल.

13 तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.

14 पाहा, ते धसकटासारखे झाले आहेत, अग्नीने त्यांना भस्म केले आहे; ज्वालेच्या तडाख्यातून त्यांना स्वत:चा बचाव करता येईना. हा शेकत बसण्याचा विस्तव नव्हे, भोवती बसण्याच्या शेगडीचा अग्नी नव्हे.

15 तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan