यशायाह 39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)हिज्कीयाला बाबेलचे जासूद भेटतात ( २ राजे 20:12-19 ; २ इति. 32:27-31 ) 1 त्या वेळी बलदानाचा पुत्र मरोदख बलदान,1 जो बाबेलचा राजा, त्याने हिज्कीयाला पत्रे व नजराणा ही पाठवली; कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते. 2 तेव्हा त्यांच्यावर हिज्कीयाने खूश होऊन त्यांना आपले अमोल भांडार दाखवले; आपले सोनेरुपे, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश, आपल्या भांडागारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यांना दाखवले, त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काहीएक राहिले नाही. 3 मग यशया संदेष्ट्याने हिज्कीया राजाकडे येऊन विचारले, “ही माणसे काय म्हणाली? व आपल्याकडे कोठून आली?” हिज्कीयाने उत्तर केले, “ती दूर देशाहून बाबेलहून माझ्याकडे आली होती.” 4 मग त्याने विचारले, “त्यांनी आपल्या घरात काय-काय पाहिले?” हिज्कीयाने म्हटले, “माझ्या घरातले सर्वकाही त्यांनी पाहिले; त्यांना माझ्या भांडागारातले दाखवले नाही असे काहीच नाही.” 5 तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “सेनाधीश परमेश्वराचे वचन ऐक; 6 पाहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी आजवर जे साठवून ठेवले आहे, ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. 7 जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील, त्यांच्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील.” 8 तेव्हा हिज्कीया यशयाला म्हणाला, “तू सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे.” तो आणखी म्हणाला, “माझ्या काळात तरी शांतता व स्थिरता राहील.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India