Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सन्हेरीबाची स्वारी
( २ राजे 18:13-37 ; २ इति. 32:1-19 )

1 हिज्कीया राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी असे झाले की अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली.

2 तेव्हा अश्शूरच्या राजाने लाखीशाहून रब-शाके1 ह्याला मोठ्या सैन्यानिशी हिज्कीया राजाकडे यरुशलेमेस पाठवले. तो परटाच्या शेताजवळील रस्त्यावरील वरच्या तळ्याच्या नळाजवळ येऊन ठेपला.

3 त्याच्याकडे खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस आसाफाचा पुत्र यवाह हे गेले.

4 तेव्हा रब-शाके त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला सांगा की राजाधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, ‘हा तुझा भरवसा कसला?

5 मी म्हणतो, तुझा युद्धसंकल्प व तुझे युद्धबळ ही केवळ वायफळ होत; तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर?

6 पाहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस; त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल; जे कोणी मिसरी राजा फारो ह्याच्यावर टेकतात ते तसेच होतात.

7 त्या सर्वांना जर तू असे म्हणशील की, आम्ही आमचा देव परमेश्वर ह्याच्यावर भिस्त ठेवतो, तर ज्या देवाची उच्च स्थाने व वेद्या काढून टाकून यहूदा व यरुशलेम ह्यांना हिज्कीया म्हणाला होता की ह्या एका वेदीपुढे भजन करा, तोच नव्हे का तो देव?

8 आता माझा धनी अश्शूरचा राजा ह्याच्याशी पैज लाव; तुला स्वार बसवण्याची ताकद असली तर तुला दोन हजार घोडे देतो.

9 माझ्या धन्याचा कनिष्ठ दर्जाचा एक तरी सरदार कसा पिटाळून लावशील? आणि तू रथ व स्वार मिळवण्याविषयी मिसरावर भिस्त ठेवतोस ना?

10 मी ह्या देशावर चढाई करून त्याचा विध्वंस करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्यावाचून? परमेश्वरानेच मला सांगितले आहे की ह्या देशावर चढाई करून जा व ह्याचा विध्वंस कर.”’

11 मग एल्याकीम, शेबना व यवाह ह्यांनी रब-शाके ह्याला विनंती केली की, “आपल्या ह्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हांला समजते; कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहूदी भाषेत आमच्याशी बोलू नका.”

12 रब-शाके ह्याने उत्तर केले की, “माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझ्याशी हे बोलण्यास मला पाठवले काय? कोटावर बसलेल्यांनी तुमच्याबरोबर आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्यांच्याकडेही मला पाठवले नाही काय?”

13 मग रब-शाके पुढे होऊन यहूदी भाषेत मोठ्याने म्हणाला, “लोकहो, राजाधिराज अश्शूरचा राजा ह्याचे म्हणणे ऐका.

14 राजा म्हणतो, “हिज्कीयास तुम्हांला भुरळ घालू देऊ नका; त्याच्याने तुमचा बचाव व्हायचा नाही.

15 ‘परमेश्वर आमचा बचाव करीलच करील, हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही,’ असे बोलून हिज्कीया तुम्हांला परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो.”

16 हिज्कीयाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो माझ्याशी सल्ला करा व माझ्याकडे निघून या, आणि तूर्त तुम्ही प्रत्येक जण आपापल्या द्राक्षीचे फळ खा, तुम्ही प्रत्येक जण आपापल्या अंजिराचे फळ खा व तुम्ही प्रत्येक जण आपापल्या हौदाचे पाणी प्या;

17 पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षांचा देश, अन्नाचा व द्राक्षींच्या मळ्यांचा देश ह्यात तुम्हांला नेईन.

18 ‘परमेश्वर आमचा बचाव करील’ असे बोलून हिज्कीया तुमचे मन न फिरवो. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडवला आहे काय?

19 हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?

20 ह्या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडवला आहे? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडवणार?”’

21 ह्यावर ते गप्प राहिले, त्याच्याशी एकही शब्द बोलले नाहीत; कारण ‘तुम्ही त्याला उत्तर देऊ नये’ अशी राजाची त्यांना ताकीद होती.

22 मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिज्कीया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिज्कीयाकडे आले व त्यांनी त्याला रब-शाके ह्याचे बोलणे कळवले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan