Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


नीतिमान राजा

1 पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील.

2 वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.

3 तेव्हा पाहणार्‍यांचे डोळे मंद होणार नाहीत; ऐकणार्‍यांचे कान ऐकतील.

4 उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्‍यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल.

5 मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत.

6 भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते.

7 ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो.

8 पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो.


यरुशलेमेच्या स्त्रियांना इशारा

9 अहो सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका; अहो निश्‍चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या.

10 अहो निश्‍चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल; कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत.

11 सुखात राहणार्‍या स्त्रियांनो, थरथर कापा, निश्‍चिंत असणार्‍यांनो, घाबर्‍या व्हा, वस्त्रे फेडा, उघड्या होऊन, कंबरेस गोणपाट गुंडाळा.

12 रम्य शेते व फलयुक्त द्राक्षांचे वेल नाहीत म्हणून त्या ऊर बडवतील.

13 माझ्या लोकांच्या भूमीवर काटेकुसळे उगवतील; ह्या उल्लासी नगराच्या सर्व आनंदमय घरांवरही ती उगवतील.

14 कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.

15 आमच्यावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणतील.

16 तेव्हा अरण्यात न्याय्यत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल.

17 नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.

18 आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.

19 पण वनाचा नाश होतेवेळी गारा पडतील व शहर निखालस जमीनदोस्त करण्यात येईल.

20 जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करता आणि बैलांना व गाढवांना मोकळेपणे फिरू देता ते तुम्ही धन्य.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan