Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मिसरी लोक मानव आहेत, देव नाहीत

1 जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!

2 तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.

3 मिसरी तर मानव आहेत, देव नाहीत; त्यांचे घोडे रक्तमांसाचे आहेत, आत्मरूप नाहीत; परमेश्वर आपला हात उगारील तेव्हा साहाय्यकर्ता ठोकर खाईल व साहाय्य पावलेलाही पडेल; ते सर्व एकंदर विनाश पावतील.

4 परमेश्वर मला म्हणाला, “जसा सिंह, तरुण सिंह, आपल्या भक्ष्यावर गुरगुरत असता, मेंढरांची टोळी बोलावून त्याच्यावर घातली तरी त्यांच्या आरोळीने घाबरायचा नाही व त्यांच्या गोंगाटाने दबायचा नाही, तसा सेनाधीश परमेश्वर सीयोन डोंगरावर त्याच्या टेकडीवर लढायला उतरेल.”

5 पक्षी जसे पाखर घालतात तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमेचे रक्षण करील; तो तिचा बचाव करून तिला सोडवील, तो तिला ओलांडून तिला सुरक्षित राखील.

6 इस्राएल वंशजांनो, ज्याच्याशी तुम्ही फितुरी केली आहे त्याच्याकडे वळा.

7 त्या दिवशी तुम्ही आपल्या हातांनी रुप्याच्या व सोन्याच्या मूर्ती करून पापात पडला; त्यांचा ते सगळे त्याग करतील.

8 “अश्शूर तलवारीने पडेल पण मनुष्याच्या नव्हे; मनुष्याची नव्हे अशी तलवार त्याला ग्राशील; तो तलवारीपुढून पळेल; त्याच्या तरुण पुरुषांना वेठीस धरतील.

9 त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan