यशायाह 20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)अश्शूर देश मिसर व कूश देश जिंकून घेईल 1 अश्शूर देशाचा राजा सर्गोन ह्याने पाठवल्यावरून तर्तान अश्दोद येथे आला, व त्याने अश्दोदाशी लढून ते हस्तगत केले. 2 त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला. 3 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तीन वर्षेपर्यंत मिसर व कूश ह्यांना चिन्ह व विस्मय व्हावा म्हणून माझा सेवक यशया उघडा व अनवाणी चालला; 4 तसा अश्शूर देशाचा राजा मिसरातील बंदिवान व कूशाचे हद्दपार केलेले तरुण व म्हातारे ह्यांना उघडे, अनवाणी व उघड्या कुल्ल्यांनी, मिसर देश फजीत व्हावा म्हणून घेऊन जाईल. 5 ज्या कूशाची त्यांनी अपेक्षा केली व ज्या मिसर देशाची त्यांना घमेंड वाटली त्याच्यामुळे ते घाबरे व लज्जित होतील. 6 त्या दिवशी ह्या समुद्रतीरीचे रहिवासी म्हणतील, ‘पाहा, अश्शूरच्या राजापासून आम्हांला सोडवावे म्हणून आम्ही ज्याची अपेक्षा केली, ज्याच्याकडे आम्ही साहाय्यार्थ धावलो त्याची अशी गत झाली; मग आमचा निभाव कसा लागेल?”’ |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India