Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यशायाह 2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराचे जागतिक शांततेचे राज्य
( मीखा 4:1-3 )

1 आमोजाचा पुत्र यशया ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी प्राप्त झालेले दृष्टान्तवचन :

2 शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.

3 देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.

4 तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील, देशोदेशींच्या बहुत लोकांचा इन्साफ करील; तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते इत:पर युद्धकला शिकणार नाहीत.


गर्विष्ठांचा परमेश्वराकडून न्याय

5 याकोबाच्या घराण्या, चल, ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू.

6 तुझे लोक, म्हणजे याकोबाचे घराणे, ह्यांचा तू त्याग केला आहेस; कारण ते पूर्वेकडील रीतिभातींत मग्न झाले आहेत, पलिष्ट्यांसारखे मांत्रिक बनले आहेत आणि परदेशीयांच्या हातात हात घालत आहेत,

7 त्यांचा देश सोन्यारुप्याने भरला आहे; त्यांच्या निधींना अंत नाही. त्यांचा देश घोड्यांनी भरून गेला आहे, त्यांच्या रथांना अंत नाही.

8 त्यांचा देश मूर्तींनी भरून गेला आहे; ते आपल्या हातांनी घडलेल्या, बोटांनी केलेल्या वस्तूंची पूजा करतात.

9 हलका मनुष्य लवला आहे, थोर मनुष्य नीचावस्था पावला आहे; त्यांना तू क्षमा करूच नकोस.

10 परमेश्वराच्या भयप्रद दृष्टीपुढून, त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापांपुढून खडकात दडून जा; आपणाला धुळीत पुरून घे.

11 त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.

12 गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील.

13 लबानोनाचे मोठे व उंच गेलेले सर्व गंधसरू, बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे;

14 सर्व उंच पर्वत, सर्व मोठे डोंगर;

15 सर्व उंच बुरूज, सर्व मजबूत तट;

16 तार्शीशाची सर्व गलबते व सर्व मनोहर मनोरे ह्यांसाठी दिवस नेमला आहे.

17 त्या दिवशी लोकांचा उन्मत्तपणा भंग पावेल. मनुष्यांचा गर्व उतरेल; आणि परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.

18 मूर्ती तर अगदी नाहीतशा होतील.

19 परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.

20 मनुष्यांनी पुजण्यासाठी केलेल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्र्या व वटवाघळे ह्यांच्यापुढे टाकून देतील.

21 परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून ते खडकांतल्या गुहांत व दगडांतल्या कपारींत शिरतील.

22 मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan