यशायाह 17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)दिमिष्काविषयी देववाणी 1 दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे. 2 अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत; ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत. ते तेथे बसतात; त्यांना घाबरवणारा कोणी नाही. 3 एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. इस्राएलाचा न्याय 4 त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल. 5 कापणी करणारा उभ्या पिकाची कवळी धरून आपल्या हाताने कणसे कापतो तसे होईल; रेफाईम खोर्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल. 6 तरी जैतून झाड हलवले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, वरच्या फांदीवर दोनतीन व त्याच्या अगदी बाहेर पसरलेल्या बहुफल शाखांवर चारपाच राहतात, तसा त्यांचा शेष राहील, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो. 7 त्या दिवशी मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहील; त्याचे डोळे इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लागतील. 8 आपल्या हातांनी बनवलेल्या वेद्यांकडे तो पाहणार नाही; आपल्या बोटांनी घडलेल्या अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती ह्यांकडे तो पाहणार नाही. 9 त्या दिवशी इस्राएलाच्या भीतीस्तव सोडून दिलेल्या व उद्ध्वस्त झालेल्या वनातील आणि डोंगराच्या माथ्यावरील स्थलांप्रमाणे त्याची तटबंदीची नगरे होतील; ती उजाड होतील. 10 कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाहीस; म्हणून तू मनोरम झाडांची2 लागवड केली व परदेशीय3 द्राक्षलतेची कलमे लावलीस; 11 ती तू लावलीस त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातलेस व लावलेले बी दुसर्या दिवशी सकाळी फुलावे असे केलेस; पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःसह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल. 12 अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात! 13 राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल. 14 संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India