यशायाह 10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 जे अन्यायाचे निर्णय करतात व जे लेखक उपद्रवकारक ठराव लिहितात त्यांना धिक्कार असो. 2 ते दाद मागणार्या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात. 3 पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल? 4 बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे. परमेश्वर अश्शूराचा उपयोग करून घेतो 5 जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या अश्शूरास धिक्कार असो. 6 मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबंधाने त्यास आज्ञा करीन. 7 तथापि त्याचा विचार काही असा नाही, त्याच्या मनाचा समज असा नाही; कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे. 8 तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय? 9 कालनो कर्कमीशासारखे, हमाथ अर्पादासारखे व शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय? 10 मूर्तीपरायण राज्ये माझ्या हाती लागली आहेत; त्यांच्या कोरीव मूर्ती तर यरुशलेम व शोमरोन ह्यांतील मूर्तींपेक्षा अधिक होत्या; 11 म्हणून शोमरोन व त्यातील मूर्ती ह्यांचे मी केले तसे यरुशलेम व त्यातील मूर्ती ह्यांचे मी करणार नाही काय?” 12 ह्यास्तव प्रभूने सीयोन डोंगर यरुशलेम ह्यासंबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा ह्याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाख ह्यांचा बदला मी घेईन. 13 कारण तो म्हणतो, “माझ्याच बाहुबलाने व माझ्या स्वत:च्या अकलेने हे मी केले आहे; मी चतुर आहे; मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत व त्यांची भांडारे लुटली आहेत; बलाढ्य वीराप्रमाणे मी तक्तांवर बसलेल्यांना ओढून काढले आहे; 14 पक्ष्याच्या कोट्याप्रमाणे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे; पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे; तेव्हा कोणी पंख फडफडवले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केली नाही,” 15 कुर्हाडीने तोडणार्यापुढे कुर्हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे. 16 ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल. 17 इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, त्याचा जो पवित्र प्रभू तो ज्वाला होईल; एका दिवसात त्याचे काटेकुटे व काटेझुडपे तो जाळून खाक करील. 18 तो त्याच्या वनोपवनांचा देह व आत्मा ह्यांची शोभा नष्ट करील. रोगी क्षीण होत जातो त्याप्रमाणे त्याची स्थिती होईल. 19 त्याचे वनवृक्ष थोडे उरतील, ते मुलालाही मोजता येतील. इस्राएलाचा अवशेष 20 त्या दिवशी असे होईल की इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, आपणांस ताडन करणार्याचा ह्यापुढे आश्रय धरून राहणार नाहीत; तर परमेश्वराचा, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आश्रय ते खर्या मनाने करतील. 21 अवशेष, याकोबाचा अवशेष, समर्थ देवाकडे परत येईल. 22 कारण हे इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या रेतीइतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परत येईल; न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमला आहे. 23 कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, सर्व देशभर नेमलेला प्रलय आणत आहे. 24 ह्यास्तव प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे माझे सीयोननिवासी प्रजे, अश्शूर मिसराप्रमाणे तुला दंडाने ताडन करील व तुझ्यावर सोटा उचलील, तरी त्याला भिऊ नकोस. 25 कारण थोडक्याच काळाने तुझ्यावरचा माझा कोप शमून माझा क्रोध त्याच्या नाशास प्रवृत्त होईल. 26 ओरेब खडकाजवळ मिद्यानाची कत्तल झाली तेव्हाच्याप्रमाणे सेनाधीश परमेश्वर त्यावर चाबूक चालवील; तो आपली काठी समुद्रावर लांबवील; ती तो मिसराप्रमाणे त्यावर उगारील. 27 त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल” आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. अश्शूराची चाल 28 तो अयाथास आला, मिग्रोनातून पार गेला; मिखमाशात त्याने आपला सरंजाम ठेवला आहे; 29 ते घाटांतून पार गेले; गेबा येथे मुक्काम करू असे ते म्हणत आहेत; रामा थरथर कापत आहे; शौलाचा गिबा पळून जात आहे. 30 गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने हेल काढून ओरड! हे लईशा, कान दे! बिचारे अनाथोथ! 31 मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत. 32 त्याचा आजचा मुक्काम नोबास आहे; तो सीयोनकन्येच्या डोंगराला, यरुशलेमेच्या टेकडीला, हाताने धमकावत आहे. 33 पाहा, प्रभू सेनाधीश परमेश्वर फांद्या भयंकर झपाट्याने छाटत आहे; उंच वाढलेली खोडे तोडून टाकली जात आहेत; उन्नत नीच होत आहेत. 34 तो लोखंडाने वनातली झाडे तोडत आहे, लबानोन प्रताप्याच्या हातून पतन पावत आहे. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India