Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

होशेय 9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सततच्या बेइमानीमुळे इस्राएलाला शिक्षा

1 हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.

2 खळे व द्राक्षकुंड ह्यांनी त्यांचा निर्वाह होणार नाही, नवा द्राक्षारस तिला दगा देईल.

3 ते परमेश्वराच्या देशात राहायचे नाहीत; एफ्राईम मिसर देशास परत जाईल; ते अश्शूरच्या देशात अमंगल पदार्थ भक्षण करतील.

4 ते परमेश्वराला द्राक्षारसाची पेयार्पणे करणार नाहीत; त्यांचे बली त्याला संतोष देणार नाहीत; त्यांचे अन्न त्यांना सुतक्यांच्या अन्नासारखे होईल; ते खाणारे सर्व अशुद्ध होतील; त्यांचे अन्न त्यांची क्षुधा शांत करण्याकरताच आहे; परमेश्वराच्या मंदिरात ते आणणार नाहीत.

5 नेमलेल्या सणाच्या दिवशी व परमेश्वराच्या उत्सवाच्या1 दिवशी तुम्ही काय कराल?

6 कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.

7 समाचार घेण्याचे दिवस आले आहेत; प्रतिफळाचे दिवस आले आहेत; इस्राएलास हे समजून येईल; तुझ्या पापांच्या राशीमुळे, तुझ्या अति वैरामुळे, संदेष्टा मूर्ख असा बनला आहे, आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे.

8 एफ्राईम माझ्या देवाला हेरणारा आहे; संदेष्टा आपल्या सर्व मार्गांत पारध्याचा फासा आहे; त्याच्या देवाच्या मंदिरात वैरभाव आहे.

9 गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे; तो त्यांचा अधर्म स्मरतो; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.

10 रानातल्या द्राक्षांप्रमाणे इस्राएल मला आढळला, अंजिराच्या हंगामातील प्रथमफळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले; पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्यांनी आपणांस वाहून घेतले; त्यांच्या वल्लभांसारखे ते अमंगळ झाले.

11 एफ्राइमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे; जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत, असे झाले आहे.

12 त्यांनी मुले लहानाची मोठी केली, तरी एकही मनुष्य उरणार नाही असे मी त्यांना अपत्यहीन करीन; मी त्यांच्यापासून निघून जाईन तेव्हा त्यांना धिक्कार असो!

13 एफ्राईम आपल्या मुलांना बळी देणार्‍या मनुष्यासारखा2 मला दिसला; तो आपल्या मुलांना वध करणार्‍याकडे घेऊन येईल.

14 हे परमेश्वरा, त्यांना दे; त्यांना काय देशील? गर्भपात करणारे गर्भाशय व शुष्क स्तन त्यांना दे.

15 त्यांची सर्व दुष्टता गिल्गालात आहे, तेथेच त्यांच्याविषयी माझ्या ठायी द्वेष उद्भवला; त्यांच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे त्यांना मी आपल्या मंदिरातून घालवून देईन; ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व सरदार फितुरी आहेत.

16 एफ्राइमावर तडाका बसला आहे; त्याचे मूळ सुकून गेले आहे; त्यांना फळ येणार नाही; त्यांना संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन.

17 माझा देव त्यांचा त्याग करील, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते राष्ट्राराष्ट्रांतून भटकणारे असे होतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan