होशेय 7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)इस्राएलाचा अधर्म व बंड 1 जेव्हा इस्राएलास मी बरे करू पाहतो तेव्हा एफ्राइमाचा अधर्म व शोमरोनाची दुष्टता दिसून येते; ते दगा करतात, चोर घरात शिरतो, बाहेर लुटारूंची टोळी लूट करते. 2 त्यांच्या सर्व दुष्टतेचे स्मरण मला आहे हे ते लक्षात आणत नाहीत; आता त्यांच्याच कर्मांनी त्यांना घेरले आहे; ती माझ्या नजरेसमोर आहेत. 3 ते राजाला आपल्या दुष्टतेने, ते सरदारांना आपल्या लबाड्यांनी, खूश करतात. 4 ते सर्व जारकर्म करणारे आहेत, भटार्याने तापवलेल्या भट्टीसारखे ते आहेत, कणीक तिंबवून ती खमिराने फुगेपर्यंतच काय तो विस्तव चाळायचा राहतो. 5 आमच्या राजाच्या शुभ दिवशी सरदार द्राक्षारसाने तप्त होऊन बेजार झाले; त्याने आपला हात निंदकांच्या हातात घातला. 6 कारस्थान करीत असताना त्यांनी आपले हृदय भट्टीसारखे केले आहे; त्यांचा कोप रात्रभर निद्रिस्त राहतो; तो सकाळी प्रज्वलित अग्नीसारखा पेट घेतो. 7 ते सगळे भट्टीप्रमाणे तप्त असतात; ते आपल्या अधिपतींना गिळून टाकतात; त्यांचे सर्व राजे पतन पावले आहेत; त्यांच्यातला कोणी माझा धावा करीत नाही. 8 एफ्राईम राष्ट्रांमध्ये मिसळतो; एफ्राईम न उलथलेल्या भाकरीसारखा झाला आहे. 9 परक्यांनी त्याची शक्ती खाऊन टाकली आहे, पण ते त्याला कळत नाही; त्याचे केस मधूनमधून पिकलेले दिसतात, पण ते त्याला कळत नाही. 10 इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो; इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव ह्याच्याकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत. 11 एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात. 12 ते जातील तेव्हा त्यांच्यावर मी आपले जाळे टाकीन, आकाशातल्या पाखरांप्रमाणे त्यांना खाली पाडीन; त्यांच्या मंडळीने ऐकले आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन. 13 त्यांना धिक्कार असो, कारण ते माझ्यापासून बहकले आहेत; त्यांचा समूळ नाश होणार, कारण त्यांनी माझ्याबरोबर फितुरी केली आहे; त्यांना उद्धरावे अशी माझी इच्छा होती; ते माझ्याविषयी खोटेनाटे बोलले आहेत. 14 त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात. 15 मी त्यांना शिक्षण दिले व बाहुबल दिले, तरी ते माझ्याविरुद्ध वाईट कल्पना मनात आणतात. 16 ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे; ते फसवणार्या धनुष्यासारखे झाले आहेत; त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तलवारीने पडतील; ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India