होशेय 6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 “चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. 2 तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. 3 चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.” 4 हे एफ्राइमा, मी तुला काय करू? हे यहूदा, मी तुला काय करू? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उडून जाणार्या दहिवराप्रमाणे आहे. 5 म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. 6 मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे; होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते. 7 त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत. 8 गिलाद हे दुष्कर्म्यांचे शहर आहे, त्यावर रक्ताची पावले उमटली आहेत. 9 मनुष्यांवर टपणार्या लुटारूंच्या टोळ्यांसारखी याजकांची टोळी आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात; त्यांनी महापाप केले आहे. 10 इस्राएलाच्या घराण्यात मी घोर प्रकार पाहिला आहे, एफ्राइमात जारकर्म चालू आहे; इस्राएल भ्रष्ट झाला आहे. 11 हे यहूदा, मी आपल्या लोकांचा बंदिवास उलटवीन तेव्हा तुझ्याही हंगामाची वेळ येईल. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India