होशेय 5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)इस्राएलास बेइमानीबद्दल शिक्षा 1 याजकांनो, ऐका; हे इस्राएलाच्या घराण्या, लक्ष दे; हे राजघराण्या, कान दे; कारण तुम्हांला शासन होणार; तुम्ही मिस्पा येथे पाश, ताबोरावर पसरलेले जाळे असे झाला आहात. 2 फितुरी लोक भ्रष्टाचारात बुडून गेले आहेत; तर त्या सर्वांना शासन करणारा मी आहे. 3 एफ्राइमाला मी ओळखतो, इस्राएल माझ्यापासून लपलेला नाही; हे एफ्राइमा, तू व्यभिचार केला आहेस; इस्राएल भ्रष्ट झाला आहे. 4 त्यांची कर्मे त्यांना आपल्या देवाकडे वळू देत नाहीत, कारण अनाचारबुद्धी त्यांच्या ठायी आहे, परमेश्वराला ते ओळखत नाहीत. 5 इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो, म्हणून इस्राएल व एफ्राईम आपल्या पापामुळे अडखळून पडतील, यहूदाही त्यांच्याबरोबर अडखळून पडेल. 6 ते आपली मेंढरे व गुरे घेऊन परमेश्वराचा आश्रय करण्यास येतील, पण तो त्यांना सापडणार नाही, तो त्यांना अंतरला आहे. 7 ते परमेश्वराबरोबर बेइमान झाले आहेत, कारण त्यांना झालेली मुले परकी आहेत; आता चंद्रदर्शन होताच ते आपल्या वतनभागांसह गडप होतील. 8 गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ-आवेन येथे करा. 9 शासनाच्या दिवशी एफ्राईम ओसाड होईल; ही खातरीने होणारी गोष्ट मी इस्राएलाच्या वंशांना कळवली आहे. 10 यहूदाचे सरदार शेताची मेर सारणार्यांसारखे झाले आहेत; मी त्यांच्यावर पाण्याप्रमाणे आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन. 11 एफ्राइमाला पीडा झाली आहे, त्याच्या हक्काची पायमल्ली झाली आहे; कारण तो स्वेच्छेने शून्याच्या मागे लागला. 12 ह्यास्तव मी एफ्राइमास कसरीसारखा व यहूदाच्या घराण्यास किडीसारखा झालो आहे. 13 एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही. 14 कारण मी एफ्राइमास सिंहासारखा व यहूदाच्या घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी फाडून टाकीन आणि परत जाईन, तो मीच; मी त्याला घेऊन जाईन, आणि सोडवणारा कोणी असणार नाही. इस्राएलाच्या पश्चात्तापाचा खोटेपणा 15 ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील : |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India