Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

होशेय 13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


एफ्राइमाच्या समूळ नाशाबद्दलचे भाकीत

1 एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.

2 ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.

3 ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे होतील, खळ्यातून वावटळीने उडणार्‍या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे ते होतील.

4 मिसर देशापासून मी परमेश्वर तुझा देव आहे, माझ्यावाचून अन्य देव तुला ठाऊक नाही, माझ्यावाचून कोणी त्राता नाही.

5 मी रानात, रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले.

6 जसा त्यांना चारा मिळाला तसे ते चरून तृप्त झाले; ते तृप्त झाले तेव्हा त्यांचे हृदय उन्मत्त झाले आणि ते मला विसरले.

7 ह्यास्तव मी त्यांना सिंहासारखा झालो आहे, मी चित्त्यासारखा वाटेवर दबा धरून बसेन.

8 जिची पिले हरण केली आहेत अशा अस्वलीसारखा मी त्यांच्यावर हल्ला करीन, मी त्यांचे ऊर फाडून टाकीन, मी त्यांना तेथे सिंहासारखे खाऊन टाकीन; वनपशू त्यांना फाडून त्यांचे तुकडे-तुकडे करतील.

9 हे इस्राएला, जो मी तुझा साहाय्यकर्ता त्या माझ्यावर तू उलटलास, त्यामुळे तुझा नाश झाला.

10 तुझ्या सर्व नगरांतून तुझा बचाव करणारा तुझा राजा कोठे गेला? ज्या तुझ्या शास्त्यांच्या बाबतीत तू म्हणावेस की, “मला राजा व अधिपती असावेत,” ते कोठे गेले?

11 मी तुझ्यावर कोपून तुला राजा दिला व तुझ्यावर रागावून तो काढून नेला.

12 एफ्राइमाच्या अधर्माचे गाठोडे बांधून ठेवले आहे, त्याचे पाप जमवून ठेवले आहे.

13 प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदना त्याला लागतील; तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण तो गर्भाशयाच्या द्वारानजीक योग्य वेळी येत नाही.

14 अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन काय? मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन काय? अरे मृत्यू, तुझ्या महामार्‍या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुझ्याकडून होणारा विनाश कोठे आहे? माझ्या दृष्टीपासून कळवळा लपला आहे.

15 तो जरी आपल्या भाऊबंदांत फलद्रूप आहे तरी पूर्वेचा वारा, रानातून परमेश्वराचा वारा येईल आणि त्याची विहीर आटेल, त्याचा झरा सुकून जाईल; तो त्याच्या निधींतील सर्व मनोरम वस्तू हरण करील.

16 शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितूर झाला आहे; ते तलवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारतील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकतील.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan