होशेय 11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)आपल्या स्वच्छंदी लोकांबद्दल देवाचा कळवळा 1 इस्राएल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली; मी त्याला आपला पुत्र म्हणून मिसरातून बोलावले. 2 जो जो मी बोलावी, तो तो ते माझ्यापासून दूर जात; ते बआलमूर्तींना बली अर्पण करत, कोरीव मूर्तीपुढे धूप जाळत. 3 मीच एफ्राइमाला चालायला शिकवले, मी त्यांना आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांना बरे केले, पण ते त्यांना ठाऊक नाही. 4 मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांना ओढले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणार्यासारखा मी त्यांना झालो; त्यांना मी ममतेने खाऊ घातले. 5 ते मिसर देशात परत जाणार नाहीत, तर अश्शूर त्यांचा राजा होईल; कारण ते माझ्याकडे परत येण्यास मान्य झाले नाहीत. 6 त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून-तोडून खाऊन टाकील. 7 माझ्या लोकांचा माझ्यापासून मागे फिरण्याकडे कल आहे, आणि त्यांना बोलावले असता कोणी उठून दृष्टी वर करीत नाहीत. 8 हे एफ्राइमा, मी तुला कसा सोडून देईन? हे इस्राएला, मी तुला कसे बहकू देईन? मी तुला अदमासारखे करू काय? सबोइमासारखे करू काय? माझे हृदय खळबळले आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. 9 मी आपल्या क्रोधसंतापाप्रमाणे करणार नाही, मी एफ्राइमाचा नाश करण्याकरता मागे फिरणार नाही; कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे; तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे; मी क्रोधावेशाने येणार नाही. 10 ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्चिमेकडून थरथर कापत येतील. 11 मिसर देशातून पक्षी व अश्शूर देशातून पारवे येतात तसे ते थरथर कापत येतील, व मी त्यांना त्यांच्या घरात बसवीन, असे परमेश्वर म्हणतो. लबाडी व छळ ह्यांबद्दल एफ्राइमाचा निषेध 12 एफ्राइमाने लबाड्यांनी मला घेरले आहे; इस्राएलाच्या घराण्याने कपटाने मला घेरले आहे. देव जो सत्य व पवित्र त्याच्याबरोबर यहूदाही बेबंदपणाने वागतो. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India