उत्पत्ती 38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)यहूदा आणि तामार 1 ह्या सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून खालच्या प्रदेशात गेला आणि अदुल्लामकर हीरा नावाच्या मनुष्याच्या घरी जाऊन राहिला. 2 तेथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहूदाच्या दृष्टीस पडली; त्याने ती बायको केली व तो तिच्यापाशी गेला. 3 ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव ‘एर’ ठेवले. 4 ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तिने त्याचे नाव ‘ओनान’ ठेवले; 5 पुन्हा तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव तिने ‘शेला’ ठेवले. तो झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहत होता. 6 मग यहूदाने आपला पहिला मुलगा एर ह्याला बायको करून दिली. तिचे नाव तामार असे होते; 7 पण यहूदाचा पहिला मुलगा एर हा परमेश्वराच्या दृष्टीने दुष्ट होता म्हणून परमेश्वराने त्याला मारून टाकले. 8 मग यहूदा ओनान ह्याला म्हणाला, “आपल्या भावजयीपाशी जा आणि दिराच्या धर्मास अनुसरून भावाचा वंश चालव.” 9 पण ओनान ह्याला ठाऊक होते की संतती झाली तर ती आपली होणार नाही म्हणून तो आपल्या भावजयीपाशी जाई तेव्हा आपले वीर्य जमिनीवर पाडी; हेतू हाच की, आपल्या भावाला आपले बीज देऊ नये. 10 हे त्याचे कृत्य परमेश्वरास दुष्ट वाटल्यावरून त्याने त्यालाही मारून टाकले. 11 यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत आपल्या बापाच्या घरी वैधव्यदशेत राहा.” त्याला वाटले की शेलाही आपल्या मुलांप्रमाणे मरायचा. मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली. 12 बराच काळ लोटल्यावर यहूदाची बायको जी शूवाची मुलगी, ती मरण पावली; तिच्यासाठी शोक करण्याचे संपल्यावर यहूदा आपला मित्र अदुल्लामकर हीरा ह्याच्याबरोबर तिम्ना येथे आपल्या मेंढरांची लोकर कातरणार्यांकडे वर गेला. 13 तेव्हा तामार हिला कोणी सांगितले की, ‘तुझा सासरा आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी तिम्ना येथे जात आहे.’ 14 तेव्हा तिने आपली वैधव्यवस्त्रे उतरवली. बुरखा घेऊन आपले शरीर लपेटून घेतले आणि तिम्नाच्या सडकेवरील एनाईम गावच्या वेशीजवळ ती जाऊन बसली; शेला प्रौढ झाला असूनही अजून आपल्याला त्याची बायको केले नाही असे तिला दिसून आले होते. 15 यहूदाने तिला पाहिले तेव्हा त्याला वाटले, ‘ही कोणी वेश्या असावी,’ कारण तिने आपले तोंड झाकले होते. 16 तेव्हा ती आपली सून आहे हे न कळून तो वाटेवरून तिच्याकडे वळून म्हणाला, “चल, मला तुझ्यापाशी येऊ दे.” तेव्हा ती म्हणाली, “माझ्यापाशी आलास तर मला काय देशील?” 17 तो म्हणाला, “मी आपल्या कळपातले एक करडू तुला पाठवून देईन;” ती म्हणाली, “ते पाठवीपर्यंत काय हडप ठेवशील?” 18 तो म्हणाला, “तुला काय हडप देऊ?” ती म्हणाली, “तुझी मुद्रिका, गोफ, व हातातील काठी दे.” ते तिला देऊन तो तिच्यापाशी गेला, आणि तिला त्याच्यापासून गर्भ राहिला. 19 तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्यवस्त्रे पुन्हा ल्याली. 20 मग त्या स्त्रीपासून आपले हडप आणण्यासाठी आपला मित्र अदुल्लामकर ह्याच्या हाती यहूदाने एक करडू पाठवले; पण त्याला ती कोठे सापडली नाही. 21 मग त्याने तेथल्या लोकांना विचारले, “एनाईम गावच्या वाटेवर एक वेश्या1 होती ती कोठे आहे?” ते म्हणाले, “येथे कोणी वेश्या नव्हती.” 22 मग तो यहूदाकडे परत जाऊन म्हणाला, “मला काही ती सापडली नाही; तेथले लोकही म्हणाले की येथे कोणी वेश्या नव्हती.” 23 तेव्हा यहूदा म्हणाला, “ते हडप तिच्यापाशीच राहू दे, नाहीतर तेथले लोक आपली छीथू करतील; मी तर करडू पाठवले, पण तुला ती सापडली नाही.” 24 ह्या गोष्टीला सुमारे तीन महिने झाले तेव्हा कोणी यहूदाला सांगितले की, “तुझी सून तामार हिने वेश्याकर्म केले व त्या जारकर्मामुळे तिला दिवस गेले आहेत.” तेव्हा यहूदा म्हणाला, “तिला बाहेर काढून जाळून टाका.” 25 तिला बाहेर काढले तेव्हा तिने आपल्या सासर्याला निरोप पाठवला की, “ह्या वस्तू ज्या पुरुषाच्या आहेत त्याच्यापासून मला गर्भ राहिला आहे.” आणखी ती म्हणाली, “नीट डोळे उघडून पाहा; ही मुद्रिका, हा गोफ व ही काठी कुणाची आहे ती.” 26 यहूदाने त्या ओळखून म्हटले, “ती माझ्यापेक्षा अधिक नीतिमान आहे; कारण मी आपला मुलगा शेला तिला नवरा करून दिला नाही.” ह्यापुढे त्याने कधी तिच्याशी शरीरसंबंध केला नाही. 27 तिच्या प्रसूतिसमयी तिच्या पोटात जुळी आहेत असे दिसून आले. 28 तिला वेणा होत असता, एका बालकाचा हात बाहेर आला तेव्हा सुइणीने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले, “पहिला हा बाहेर पडला.” 29 त्याने आपला हात आखडून घेतला तेव्हा त्याचा भाऊ बाहेर पडला. तेव्हा सुईण म्हणाली, “तू आपल्यासाठी कशी वाट फोडलीस?” म्हणून त्याचे नाव ‘पेरेस’1 असे ठेवले. 30 मग ज्याच्या हाताला लाल सूत बांधले होते तो त्याचा भाऊ बाहेर पडला आणि त्याचे नाव ‘जेरह’ ठेवले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India