Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उत्पत्ती 35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो

1 मग देवाने याकोबाला सांगितले की, “ऊठ, वर जाऊन बेथेल येथे राहा; आणि तू आपला भाऊ एसाव ह्याच्यापुढून पळून चालला असताना ज्या देवाने तुला दर्शन दिले होते त्याच्यासाठी तेथे वेदी बांध.”

2 मग याकोब आपल्या घरच्या मंडळीला व आपल्या-बरोबरच्या सगळ्या माणसांना म्हणाला, “तुमच्यामध्ये जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वत:ला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला.

3 आपण उठून वर बेथेलास जाऊ; तेथे मी देवासाठी वेदी बांधीन; त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले; आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता.”

4 तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व परके देव आणि त्यांच्या कानांत असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली; आणि याकोबाने शखेमाजवळ असलेल्या एला वृक्षाखाली ती पुरून टाकली.

5 मग त्यांनी कूच केले; आणि आसपासच्या नगरांतल्या लोकांच्या मनात देवाने अशी दहशत उत्पन्न केली की ते याकोबाच्या मुलांच्या पाठीस लागले नाहीत.

6 ह्या प्रकारे याकोब आपल्याबरोबरच्या सर्व लोकांसह कनान देशात लूज (म्हणजे बेथेल) येथे येऊन पोहचला.

7 तेथे त्याने एक वेदी बांधली व त्या ठिकाणास एल-बेथेल (बेथेलचा देव) हे नाव दिले; कारण तो आपल्या भावापासून पळून चालला असता येथेच देव त्याला प्रकट झाला होता.

8 रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरले; ह्या वृक्षाचे अल्लोन-बाकूथ (रुदनवृक्ष) असे नाव ठेवले.

9 याकोब पदन-अरामाहून परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.

10 देव त्याला म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे; पण आतापासून तुला याकोब म्हणणार नाहीत, तर तुझे नाव इस्राएल होईल.” आणि देवाने त्याला इस्राएल हे नाव दिले.

11 देव त्याला आणखी म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो; तुझ्यापासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्रसमूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील.

12 जो देश मी अब्राहाम व इसहाक ह्यांना दिला तो तुला देईन आणि तुझ्यामागे तुझ्या संततीलाही तोच देश देईन.”

13 मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले होते तेथूनच आरोहण केले.

14 आणि जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते तेथे त्याने एक पाषाणस्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्याला तैलाभ्यंग केला.

15 जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या ठिकाणाचे नाव याकोबाने ‘बेथेल’ असे ठेवले.


राहेलीचा मृत्यू

16 मग त्यांनी बेथेलहून कूच केले आणि एफ्राथ गाव अद्याप काहीसा दूर असता राहेल प्रसूत झाली. तिची प्रसूती कष्टाची होती.

17 प्रसूतिवेदना होत असता सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस, कारण तुला हाही मुलगाच आहे.”

18 ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव ‘बेनओनी’ (माझ्या दु:खाचा पुत्र) ठेवले; तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव ‘बन्यामीन’ (माझ्या उजव्या हाताचा पुत्र) असे ठेवले.

19 ह्याप्रमाणे राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलेहेम) गावाच्या वाटेवर तिला पुरले.

20 मग याकोबाने तिच्या कबरेवर एक स्तंभ उभारला; तो राहेलीच्या कबरेवरचा स्तंभ आजवर कायम आहे.

21 नंतर इस्राएलाने कूच करून एदेर कोटाच्या पलीकडे आपला डेरा दिला.

22 इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


याकोबाचे मुलगे
( १ इति. 2:1-2 )

23 लेआ हिचे मुलगे : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.

24 राहेलीचे मुलगे : योसेफ व बन्यामीन.

25 राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे : दान व नफताली.

26 आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे : गाद व आशेर. हे याकोबाचे मुलगे त्याला पदन-अरामात झाले.

27 मग किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथील मम्रेस याकोब आपला पिता इसहाक ह्याच्याकडे गेला; तेथेच अब्राहाम व इसहाक हे पूर्वी वस्तीस होते.


इसहाकाचा मृत्यू

28 इसहाकाचे वय एकशे ऐंशी वर्षांचे झाले.

29 मग त्याने प्राण सोडला; तो वृद्ध व पुर्‍या वयाचा होऊन मृत्यू पावला आणि स्वजनांस जाऊन मिळाला; त्याचे मुलगे एसाव आणि याकोब ह्यांनी त्याला मूठमाती दिली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan