उत्पत्ती 33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)याकोब व एसाव ह्यांच्यात झालेला सलोखा 1 ह्यानंतर याकोबाने दृष्टी वर करून पाहिले तर एसाव चारशे माणसे बरोबर घेऊन येत आहे असे त्याला दिसले; तेव्हा त्याने लेआ व राहेल आणि त्या दोन दासी ह्यांच्याकडे आपापली मुले दिली. 2 त्याने दासी व त्यांची मुले सर्वांत पुढे, त्यांच्यानंतर लेआ व तिची मुले आणि सर्वांच्या मागे राहेल व योसेफ ह्यांना ठेवले. 3 तो स्वत: त्या सर्वांच्या पुढे चालत गेला, आणि भावाजवळ जाऊन पोहचेपर्यंत त्याने सात वेळा भूमीपर्यंत लवून नमन केले. 4 तेव्हा एसाव त्याला भेटण्यासाठी धावत आला, त्याने त्याला आलिंगन दिले; त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे चुंबन घेतले, आणि ते दोघे रडले. 5 एसावाने दृष्टी वर करून बायका व मुले पाहिली तेव्हा तो म्हणाला, “तुझ्याबरोबर हे कोण आहेत?” तो म्हणाला, “आपल्या दासावर देवाने कृपा करून दिलेली ही मुले आहेत.” 6 तेव्हा त्या दासींनी मुलांसह जवळ येऊन त्याला नमन केले. 7 मग लेआ व तिची मुले ह्यांनीही जवळ येऊन त्याला नमन केले, आणि त्यांच्यामागून योसेफ व राहेल ह्यांनी जवळ येऊन त्याला नमन केले. 8 मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.” 9 एसाव म्हणाला, “माझ्याजवळ भरपूर आहे, माझ्या बंधू, तुझे तुलाच राहू दे.” 10 याकोब म्हणाला, “नाही, नाही; आपली माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर माझ्या हातची एवढी भेट घ्याच, कारण आपले दर्शन मला झाले हे जणू काय देवाच्या दर्शनासारखे आहे आणि आपण माझ्यावर संतुष्ट झाला आहात, 11 तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच; कारण देवाने माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्वकाही आहे.” याकोबाने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली. 12 मग एसाव त्याला म्हणाला, “चला, आपण वाटेस लागून पुढे जाऊ, मी तुझ्यापुढे चालतो.” 13 याकोब त्याला म्हणाला, “माझ्या स्वामीला ठाऊक आहे की ही मुले सुकुमार आहेत; आणि दूध पाजणार्या शेळ्या, मेंढ्या व गाई ह्यांचे मला पाहिले पाहिजे; त्यांची एक दिवस फाजील दौड केली तर अवघा कळप मरून जाईल. 14 तर स्वामी, आपण आपल्या दासाच्या पुढे जा, माझी गुरे, मेंढरे व मुले ह्यांच्याने चालवेल तसा मी हळूहळू चालत सेईर येथे माझ्या स्वामीकडे येईन.” 15 मग एसाव म्हणाला, “माझ्याजवळच्या लोकांपैकी काही तुझ्याबरोबर ठेवू दे.” तो म्हणाला, “कशाला? माझ्या स्वामीची कृपादृष्टी माझ्यावर असली म्हणजे पुरे.” 16 तेव्हा एसाव त्याच दिवशी सेईरास परत जायला निघाला. 17 पण याकोब मजल दरमजल करत सुक्कोथास गेला; तेथे त्याने स्वतःसाठी घर बांधले व आपल्या गुराढोरांसाठी खोपट्या केल्या; म्हणून त्या ठिकाणाचे नाव सुक्कोथ (खोपट्या) असे पडले. 18 याकोब पदन-अरामापासून प्रवास करत कनान देशातील शखेम नावाच्या नगरास सुखरूप पोहचला, आणि नगरापुढे तळ देऊन राहिला. 19 जेथे त्याने डेरा दिला होता तेथील काही जमीन शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा1 देऊन त्याने विकत घेतली. 20 आणि तेथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव एल-एलोहे-इस्राएल (देव, इस्राएलाचा देव) असे ठेवले. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India