Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

उत्पत्ती 23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


सारेचा मृत्यू : आपल्या मृतांना पुरण्यासाठी अब्राहाम जमीन विकत घेतो

1 सारा एकशे सत्तावीस वर्षे जगली; एवढेच तिचे आयुष्य होते.

2 सारा ही कनान देशातील किर्याथ-आर्बा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली, आणि अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करायला आला.

3 अब्राहाम आपल्या मयताजवळून उठून हेथींना म्हणाला,

4 “मी तुमच्यामध्ये उपरा व परदेशी आहे; माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मयतास दृष्टिआड करीन.

5 तेव्हा हेथी अब्राहामाला म्हणाले,

6 “स्वामी, आमचे ऐका; आमच्यामध्ये आपण देवाचे एक सरदार आहात; आपण आमच्या वाटेल त्या कबरेत आपल्या मयतास मूठमाती द्या; आपल्या मयतास मूठमाती देण्यासाठी आपली खाजगी कबर द्यायला आमच्यातला कोणीही नाही म्हणणार नाही.”

7 तेव्हा अब्राहामाने उठून त्या देशाच्या लोकांना म्हणजे हेथींना नमन केले.

8 तो त्यांना म्हणाला, “मी आपल्या मयतास दृष्टिआड करावे अशी तुमची इच्छा असल्यास माझे म्हणणे ऐका; एफ्रोन बिन सोहर ह्याच्याकडे रदबदली करा की,

9 त्याच्या शेताच्या सीमेच्या आत असलेली त्याची मकपेला नावाची गुहा आहे, ती माझ्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून त्याने तुमच्या समक्ष पुरी किंमत घेऊन मला द्यावी.

10 एफ्रोन हित्ती हा हेथींमध्ये बसलेला होता. तो हेथींच्या समक्ष, त्याच्या गावच्या वेशीतून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांसमक्ष अब्राहामाला म्हणाला,

11 “स्वामी, नाही, माझे ऐका. ते शेत आणि त्यात असलेली गुहा ही मी आपल्याला देतो. माझ्या भाऊबंदांसमक्ष मी आपल्याला देतो, तेथे आपल्या मयतास माती द्या.”

12 तेव्हा अब्राहामाने त्या देशाच्या लोकांना नमन केले,

13 आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे एवढे अवश्य ऐक. मी शेताचे पैसे देतो ते माझ्याकडून घे म्हणजे मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन.”

14 एफ्रोनाने अब्राहामाला उत्तर दिले,

15 “स्वामी माझे ऐका : ही अवघी चारशे शेकेल रुपे किंमतीची जमीन, तिचे काय मोठे? आपण आपल्या मयतास मूठमाती द्या.”

16 अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी चारशे शेकेल रुपे त्याला तोलून दिले.

17 ह्याप्रमाणे एफ्रोनाचे शेत जे मम्रेच्या पूर्वेस मकपेलात होते ते व त्यातील गुहा, आणि शेतातील आणि चतु:सीमांतील प्रत्येक झाड,

18 हेथींसमक्ष, वेशीतून जाणार्‍या-येणार्‍या सर्वांसमक्ष, अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले.

19 नंतर अब्राहामाने आपली बायको सारा हिला कनान देशातले मम्रे म्हणजे हेब्रोन ह्याच्या पूर्वेस म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले;

20 आणि ते शेत गुहेसहित कबरस्तान व्हावे म्हणून हेथींकडून अब्राहामाच्या कबजात पूर्णपणे आले.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan