Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

एज्रा 3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


उपासनेची प्रस्थापना

1 इस्राएल लोक आपापल्या नगरांमध्ये राहू लागल्यावर सातवा महिना सुरू झाला तेव्हा लोक एकचित्त होऊन यरुशलेमेत जमा झाले.

2 तेव्हा येशूवा बिन योसादाक व त्याचे बांधव जे याजक आणि जरूब्बाबेल बिन शल्तीएल व त्याचे बांधव ह्यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्राएलाच्या देवाची वेदी बांधली.

3 त्यांनी वेदीची स्थापना पूर्वीच्या स्थानी केली; कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत वाटत होती; तिच्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ होमार्पण अर्थात नित्य सांजसकाळची होमार्पणे ते करू लागले.

4 त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पण केले.

5 नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पण केले.

6 सातव्या महिन्याच्या प्रतिपदेपासून ते परमेश्वरास होमबली अर्पू लागले; तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापि घातला नव्हता.

7 त्यांनी पाथरवटांना व सुतारांना पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश ह्याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सीदोनी व सोरी लोकांना खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल दिले. मंदिराच्या पुनर्रचनेची सुरुवात

8 यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसर्‍या वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात जरूब्बाबेल बिन शल्तीएल, येशूवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला; वीस वर्षांचे व त्यांहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यांना परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले.

9 तेव्हा येशूवा, त्याचे पुत्र व बांधव, कदमीएल व त्याचे पुत्र, यहूदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र, आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले.

10 बांधकाम करणार्‍यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलाचा राजा दावीद ह्याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती कर्णे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी ह्यांना उभे केले.

11 “परमेश्वर चांगला आहे व इस्राएलावर त्याची दया सनातन आहे” असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जयजयकार केला.

12 तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळांचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी ह्या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यांना रडू कोसळले व त्यांच्यातले पुष्कळ जण हर्षभराने जयघोष करू लागले.

13 जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद ह्यांतील भेद लोकांना कळेना, कारण लोक उच्च स्वराने जयजयकार करत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan