यहेज्केल 47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)मंदिरापासून वाहणारे आरोग्यदायक पाणी 1 मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तेव्हा पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. 2 त्याने मला उत्तरद्वाराच्या वाटेने बाहेर नेले, व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले, तेव्हा पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. 3 मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. 4 त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी कंबरेपर्यंत होते. 5 त्याने आणखी हजार हात अंतर मापले तर त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. 6 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस ना?” मग त्याने मला नदीतीराने माघारी नेले. 7 परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. 8 तो मला म्हणाला, “हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. 9 ही महानदी जाईल तेथे तेथे तिच्यात जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तिच्यात मासे विपुल होतील, कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्वकाही निरोगी होईल; जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. 10 तिच्या तीरी धीवर उभे राहून एन-गेदीपासून एन-इग्लाइमापर्यंत पाग टाकतील; महासागरातल्या माशांप्रमाणे त्या नदीत भिन्नभिन्न जातींचे विपुल मासे सापडतील. 11 त्यातील पाणथळे व दलदली ह्यांचे पाणी निर्दोष होणार नाही; ती खारटाणेच राहतील. 12 नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतर्हेची झाडे वाढतील; त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे; त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील.” जमिनीची वाटणी व सरहद्दी 13 प्रभू परमेश्वर म्हणतो : “तुम्ही हा देश इस्राएलाच्या बारा वंशांना वतन म्हणून वाटून द्याल तेव्हा त्यात योसेफाचे दोन वाटे धरून त्याच्या सीमा येणेप्रमाणे असाव्यात. 14 ह्या देशाचे तुम्हांला सारखे वाटे मिळून तुम्ही येथील वतन पावाल कारण हा देश तुमच्या वडिलांना देईन अशी मी हात वर करून शपथ घेतली आहे; ह्या प्रकारे हा देश तुमचे वतन होईल. 15 देशाच्या सीमा येणेप्रमाणे : उत्तरेस मोठ्या समुद्रा-पासून हेथलोनाच्या वाटेने सदादाच्या सरहद्दीपर्यंत; 16 (दिमिष्काच्या व हमाथाच्या सरहद्दींमधील) हमाथ, बेरोथा, सिब्राईम व हौरानाच्या सीमेवरील हासेर-हत्तीकोनपर्यंत. 17 समुद्रापासून ही सीमा म्हणजे दिमिष्काच्या सरहद्दीवरील गाव हसर-एनोन येथवर, उत्तरेस हमाथ ही सीमा. ही उत्तर बाजू झाली. 18 पूर्वेस हौरान व दिमिष्क, गिलाद व इस्राएल देश ह्यांच्या दरम्यान असलेली यार्देन नदी; सरहद्दीपासून पूर्वसमुद्रापर्यंत मोजणी करा; ही पूर्व बाजू झाली. 19 दक्षिण सीमा ही : तामारपासून मरीबोथ कादेशाच्या पाण्यापर्यंत, व तेथून मिसर देशाच्या नाल्याने थेट मोठ्या समुद्रापर्यंत; ही दक्षिण बाजू झाली. 20 पश्चिम सीमा ही : दक्षिण सीमेपासून हमाथाच्या घाटापर्यंतचा मोठा समुद्र; ही पश्चिम बाजू झाली. 21 ह्या प्रकारे तुम्ही हा देश आपसात इस्राएलाच्या वंशांप्रमाणे वाटून द्या. 22 असे करा की तुम्ही आपल्या वतनासाठी आणि तुमच्यात वस्ती करणारे व तुमच्यात राहून संतती झालेले परराष्ट्रीय लोक ह्यांच्या वतनासाठी हा देश चिठ्ठ्या टाकून वाटून घ्या. हे पराष्ट्रीय लोक इस्राएल वंशजांमध्ये जन्मलेले आहेत असे धरून चाला; त्यांना तुमच्याबरोबर इस्राएलाच्या वंशांमध्ये वाटा मिळावा. 23 इस्राएलाच्या ज्या विभागात कोणी परका राहत असेल त्यात त्याला वतन द्यावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India