Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


मंदिरातील सेवा

1 मग त्याने मला त्या मंदिराच्या पूर्वाभिमुख असलेल्या बाहेरच्या द्वारास जाणार्‍या वाटेने परत आणले; ते द्वार बंद होते.

2 तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, “हे द्वार बंद ठेवावे, उघडू नये, ह्याने कोणी प्रवेश करू नये; कारण परमेश्वर, इस्राएलाचा देव, ह्याने ह्या द्वाराने प्रवेश केला म्हणून हे बंद ठेवावे.

3 राजाविषयी म्हणाल तर तो राजा आहे म्हणून परमेश्वरासमोर त्या द्वारात बसून तो भोजन करील; द्वाराच्या देवडीच्या वाटेने तो येईल-जाईल.”

4 नंतर त्याने मला उत्तर द्वारास जाणार्‍या वाटेने मंदिरासमोर नेले; मी पाहिले तर परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते; तेव्हा मी उपडा पडलो.

5 मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवपुत्रा, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व सर्व नियम ह्यांविषयी जे सर्व मी तुला सांगतो त्याकडे चित्त दे; डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रत्येक द्वाराने पवित्रस्थानात जाण्यासंबंधाने जे सांगतो त्याकडे चित्त दे.

6 त्या फितुरी इस्राएल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल वंशजहो, तुम्ही ही सगळी अमंगळ कृत्ये केली तेवढी पुरे;

7 तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.

8 तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण केली नाही, तर तुम्ही माझ्या पवित्रस्थानात आपल्याऐवजी त्यांना माझ्या पवित्र वस्तूंचे राखणदार नेमले.

9 प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल वंशजांमध्ये राहणार्‍या, मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परदेशीयांपैकी कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करता कामा नये.

10 इस्राएल बहकून गेले तेव्हा जे लेवी माझ्यापासून दूर गेले व आपल्या मूर्तींच्या मागे लागून मला सोडून बहकले त्यांना आपल्या अधर्माचे प्रतिफळ भोगावे लागेल.

11 ते माझ्या पवित्रस्थानातले चाकर होतील; मंदिराच्या द्वारांपुढे ते पहारेकरी होतील व माझ्या मंदिरात ते सेवाचाकरी करतील; ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञ ह्यांचे पशू कापतील; व लोकांची सेवाचाकरी करण्यास त्यांच्यापुढे उभे राहतील.

12 त्यांनी त्यांच्या मूर्तींपुढे इस्राएल घराण्याची सेवाचाकरी केली व ते त्यांना पापात पाडणारे अडथळे झाले, म्हणून मी त्यांच्यावर आपला हात उगारला आहे आणि ते आपल्या अधर्माचे प्रतिफळ भोगतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

13 त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी माझ्यासमक्ष येता कामा नये; माझ्या सर्व पवित्र वस्तू, परमपवित्र वस्तू ह्यांच्याजवळ त्यांनी येता कामा नये; तर त्यांनी आपली अप्रतिष्ठा सोसावी व आपल्या अमंगळ कर्मांबद्दल शिक्षा भोगावी.

14 माझ्या मंदिरात जी काही सेवा होत असते तिला अनुसरून व त्यात जे काही करायचे असते त्यासंबंधाने माझ्या मंदिराची राखण करणारे असे मी त्यांना करीन.

15 इस्राएल वंशज मला सोडून बहकून गेले तेव्हा लेवी याजकांपैकी सादोक वंशज ह्यांनी माझ्या पवित्रस्थानाची सेवाचाकरी केली, म्हणून ते माझ्यासमीप येऊन माझी सेवा करतील, माझ्यासमोर उभे राहतील व मला चरबी व रक्त अर्पण करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो;

16 ते माझ्या पवित्रस्थानात येतील, ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या मेजाजवळ येतील आणि माझ्या पवित्र वस्तूंचे रक्षण करतील.

17 ते आतल्या अंगणाच्या द्वारांकडे जातील तेव्हा त्यांनी तागाची वस्त्रे परिधान करावीत; ते आतल्या अंगणातील द्वारात व मंदिरात सेवा करतील तेव्हा त्यांनी लोकरीची वस्त्रे घालू नयेत.

18 त्यांनी आपल्या डोक्यात तागाची पागोटी घालावीत; त्यांनी कंबरेस तागाचे चोळणे घालावेत; त्यांनी घाम येण्यासारखे कंबरेस काही वेष्टू नये.

19 ते बाहेरील अंगणात जातील, लोकांमध्ये बाहेरील अंगणात जातील, तेव्हा त्यांच्या वस्त्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळची वस्त्रे काढून पवित्र खोल्यांत ठेवावीत व दुसरी वस्त्रे ल्यावीत.

20 त्यांनी आपली डोकी मुंडवू नयेत, किंवा केस लांब वाढू देऊ नयेत तर त्यांनी आपल्या डोक्याचे केस कापावेत.

21 आतल्या अंगणात जायच्या वेळी कोणाही याजकाने द्राक्षारस पिऊ नये.

22 त्यांनी विधवेबरोबर किंवा सोडलेल्या स्त्रीबरोबर विवाह करू नये, तर इस्राएली वंशातल्या कुमारीबरोबर अथवा कोणा याजकाची विधवा असल्यास तिच्याबरोबर विवाह करावा.

23 त्यांनी माझ्या लोकांना शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, ह्यांचा भेद त्यांना त्यांनी दाखवून द्यावा.

24 तंट्याबखेड्यांचा निवाडा करण्यास त्यांनी तत्पर असावे; माझ्या निर्णयांप्रमाणे हा निवाडा त्यांनी करावा; सर्व सणांत माझे विधी व नियम पाळावेत आणि माझ्या शब्बाथांचे पवित्रपणे पालन करावे.

25 त्यांनी प्रेतास शिवून अशुचि होऊ नये; मात्र आई, बाप, मुलगा, मुलगी, भाऊ व अविवाहित बहीण ह्यांच्या बाबतीत ते अशुचि झाले असता चालेल.

26 तो शुद्ध झाल्यावर आणखी सात दिवस मोजावेत.

27 मग तो पवित्रस्थानात, म्हणजे अर्थात आतल्या अंगणात, पवित्रस्थानातील सेवा करण्यास जाईल त्या दिवशी त्याने आपले पापार्पण करावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

28 त्यांना वतन काय म्हणाल तर मी त्यांचे वतन आहे; त्यांना इस्राएलात वाटा देऊ नये; त्यांचा वाटा मी आहे.

29 अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ही त्यांनी खावीत; इस्राएलांनी वाहिलेली हरएक वस्तू त्यांची व्हावी.

30 सर्व प्रथमफळांचा प्रथमभाग, समर्पित अंश म्हणून अर्पण करायची प्रत्येक वस्तू याजकांची व्हावी; तुम्ही तिंबलेल्या कणकेचा पहिला गोळा याजकांना द्यावा म्हणजे तुमच्या घराला बरकत येईल.

31 कोणताही आपोआप मेलेला किंवा फाडून टाकलेला प्राणी याजकांनी खाऊ नये; मग तो पक्षी असो किंवा पशू असो.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan