Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरते

1 मग पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे त्याने मला नेले;

2 तेव्हा पाहा, इस्राएलाच्या देवाचे वैभव पूर्वेकडून प्रकट झाले; त्याचा शब्द महापुराच्या ध्वनीसारखा होता; व त्याच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशित झाली.

3 मी नगराचा नाश करण्यास आलो होतो तेव्हाच्या दृष्टान्ता-सारखा दृष्टान्त मी पाहिला; खबार नदीतीरी जो दृष्टान्त मी पाहिला तसे दृष्टान्त माझ्या दृष्टीस पडले; तेव्हा मी उपडा पडलो.

4 पूर्वाभिमुख असलेल्या द्वारावाटे परमेश्वराचे तेज मंदिरात आले.

5 तेव्हा आत्म्याने मला उचलून आतील अंगणात नेले, तेव्हा पाहा, परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरून गेले होते

6 आणि मंदिरातून कोणी माझ्याबरोबर बोलत आहे असे मी ऐकले आणि माझ्याजवळ एक पुरुष उभा होता.

7 तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थळ, माझ्या पदासनाचे स्थळ आहे; तेथे मी इस्राएल वंशजांमध्ये सर्वकाळ राहीन; इस्राएल घराण्याचे लोक व त्यांचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उच्च स्थानांवर ह्यापुढे माझ्या2 पवित्र नामाला बट्टा लावणार नाहीत;

8 त्यांनी आपला उंबरठा माझ्या उंबरठ्याशेजारी, आपले द्वारस्तंभ माझ्या द्वारस्तंभाशेजारी उभारले आणि माझ्या व त्यांच्यामध्ये केवळ एक भिंत होती; अमंगळ कृत्ये करून त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावला म्हणून मी रागाने त्यांचा नाश केला.

9 आता त्यांनी आपला व्यभिचार व त्यांच्या राजांनी स्थापलेल्या प्रेतवत मूर्ती माझ्यापासून दूर घालवाव्यात, मग मी त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहीन.


मंदिर व वेदीसंबंधी नियम

10 हे मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास हे मंदिर दाखव, म्हणजे ते आपल्या पातकांबद्दल लज्जित होतील व त्यांनी ह्या नमुनेदार इमारतीचे माप घ्यावे.

11 त्यांनी केलेल्या सर्व कृत्यांबद्दल ते लज्जित झाले म्हणजे त्यांना ह्या मंदिराचा आकार, त्याची रचना, त्यात जाण्यायेण्याचे मार्ग, त्यातील सर्व आकृती, त्याचे सर्व विधी व त्याचे सर्व नियम त्यांना दाखव व त्यांच्यासमोर लिहून ठेव म्हणजे त्याच्या सर्व नियमांचे व विधींचे अवलंबन करून त्याप्रमाणे ते वागतील.

12 मंदिराचा हा नियम आहे; पर्वताच्या माथ्यावरील भोवतालचा सर्व प्रदेश अत्यंत पवित्र आहे. पाहा, मंदिराचा हा नियम आहे.

13 हातांनी वेदीची मापे ही आहेत. (हा हात म्हणजे एक हात व चार अंगुळे); तिचा तळभाग हातभर उंच, हातभर रुंद आणि तिचा कडेचा पाटथरा वीतभर; हा वेदीचा पाया.

14 तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात आणि खालच्या बैठकीपासून वरच्या बैठकीपर्यंत उंची चार हात व रुंदी एक हात.

15 वेदीच्या वरच्या भागाची उंची चार हात; वेदीच्या अग्निकुंडाला लागून वर गेलेली चार शृंगे होती.

16 वेदीचे अग्निकुंड बारा हात लांब व बारा हात रुंद होते; ते समचौरस होते.

17 तिची बैठक चौदा हात लांब व चौदा हात रुंद अशी चौरस होती; तिच्याभोवतालचा पाटथरा अर्धा हात, आणि तिचा तळभाग सभोवार एक हात उंच होता; तिच्या पायर्‍या पूर्वाभिमुख होत्या.”

18 तेव्हा तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, प्रभू परमेश्वर म्हणतो, ह्या वेदीवर होमार्पण करावे व रक्त शिंपडावे म्हणून ती बांधून काढतील. त्यानंतरच्या दिवसांचे तिच्यासंबंधीचे विधी हे :

19 माझी सेवा करण्यास माझ्यासमीप येणार्‍या लेवी वंशातला सादोकाच्या कुळातील याजक ह्याला पापार्पण करण्यासाठी तू एक गोर्‍हा दे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

20 तू त्याचे रक्त घेऊन वेदीच्या चार्‍ही शृंगांवर, बैठकीच्या चार्‍ही कोपर्‍यांवर व भोवतालच्या पाटथर्‍यावर शिंपड; अशा प्रकारे प्रायश्‍चित्त करून ती शुद्ध कर.

21 नंतर तू पापार्पणाचा बैल घे व त्याने पवित्रस्थानाच्या बाहेर मंदिराच्या नेमलेल्या जागी त्याचा होम करावास.

22 दुसर्‍या दिवशी पापार्पण करण्यासाठी एक निर्दोष बोकड घे; बैलाच्या होमाने जशी वेदी शुद्ध केली तशी ह्यानेही केली पाहिजे.

23 शुद्धीकरण संपले म्हणजे एक निर्दोष गोर्‍हा व कळपातला एक निर्दोष एडका अर्पण कर.

24 तू ते परमेश्वरासमोर आण; मग याजक त्यांच्यावर मीठ टाकतील व त्यांचे हवन करून ते परमेश्वरास अर्पण करतील.

25 तू सात दिवस रोज एकेका निर्दोष बकर्‍याचे पापार्पण कर; एक गोर्‍हा व कळपातील एक निर्दोष एडका हेही त्यांनी अर्पण करावे.

26 ह्याप्रमाणे सात दिवस वेदीबद्दल प्रायश्‍चित्त करून तिची शुद्धी करावी; असा तिचा संस्कार व्हावा.

27 ह्या दिवसांच्या कार्याची समाप्ती झाल्यावर आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची होमार्पणे व तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करतील आणि मी तुमच्यावर प्रसन्न होईन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan