Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा त्याने मला उत्तरेकडच्या रस्त्याने बाहेरच्या अंगणात नेले आणि ती सोडलेली जागा व उत्तरेकडील इमारत ह्यांच्यासमोरील खोल्या असलेल्या इमारतीत नेले.

2 तिचा दरवाजा उत्तराभिमुख असून तिची लांबी शंभर हात व रुंदी पन्नास हात होती.

3 आतील वीस हाताच्या अंगणासमोर व बाहेरील अंगणाच्या फरसबंदीसमोर तिसर्‍या मजल्याला समोरासमोर सज्जे होते.

4 खोल्यांसमोर दहा हात रुंद व शंभर1 हात लांब अशी एक वाट होती; त्यांचे दरवाजे उत्तराभिमुख होते.

5 वरच्या मजल्याची जागा सज्जांत गुंतली होती म्हणून तेथल्या खोल्या खालच्या व मधल्या मजल्यांवरील खोल्यांच्या मानाने लहान होत्या.

6 कारण त्या खोल्यांचे तीन मजले होते; अंगणातल्या-प्रमाणे त्यांना खांब नव्हते; म्हणून खालच्या व मधल्या मजल्यांच्या जागेपेक्षा वरली जागा संकुचित होती;

7 आणि त्या खोल्यांशी समांतर अशी खोल्यांसमोरील बाहेरच्या अंगणाकडे गेलेली एक भिंत होती; तिची लांबी पन्नास हात होती.

8 कारण बाहेरील अंगणाच्या खोल्यांची एकंदर लांबी पन्नास हात होती आणि पाहा, गाभार्‍यापुढे ती शंभर हात होती.

9 ह्या खोल्यांच्या खाली पूर्वेस प्रवेशद्वार होते, त्यातून बाहेरच्या अंगणातून येणारे त्या खोल्यांत जात असत.

10 दक्षिणेकडील2 अंगणाच्या लांबीकडील भिंतीला लागून त्या सोडलेल्या जागेसमोर व इमारतीसमोर खोल्या होत्या.

11 उत्तरेकडील खोल्यांसमोर जसा रस्ता होता तसा त्याच्या समोरही रस्ता होता; त्यांची लांबीरुंदी, त्यांच्या बाहेर जाण्याच्या सर्व वाटा व त्यांची एकंदर व्यवस्था त्यांच्या-प्रमाणेच होती.

12 त्यांच्या दरवाजांप्रमाणे दक्षिणाभिमुख असलेल्या खोल्यांचे दरवाजे होते; रहदारीच्या रस्त्याच्या तोंडाजवळ म्हणजे उजव्या भिंतीजवळील वाटेवर एक द्वार होते; त्यांतून पूर्वेकडून येणारे लोक प्रवेश करीत.

13 तो मला म्हणाला, “सोडलेल्या जागेसमोरील उत्तरेकडल्या खोल्या व दक्षिणेकडल्या खोल्या पवित्र असून त्यांत परमेश्वरासमोर जाणारे याजक ह्यांनी परमपवित्र पदार्थांचे सेवन करावे; तेथे त्यांनी अन्नबली, पापबली, दोषबली वगैरे परमपवित्र पदार्थ ठेवावेत; कारण ते स्थान पवित्र आहे.

14 याजक आत गेल्यावर पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात त्यांनी तसेच जाऊ नये; तर सेवेच्या वेळची आपली वस्त्रे त्यांनी त्या खोल्यांत ठेवावीत कारण ती पवित्र आहेत; मग त्यांनी दुसरी वस्त्रे घालून सार्वजनिक स्थानी जावे.”

15 त्याने मंदिराचे आतले माप घेण्याचे संपवले तेव्हा त्याने पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराने मला बाहेर नेले व ते बाहेरून चोहोबाजूंनी मापले.

16 त्याने मापण्याच्या काठीने पूर्वभाग एकंदर पाचशे हात3 मापला.

17 त्याने मापण्याच्या काठीने उत्तरभाग एकंदर पाचशे हात मापला.

18 तसाच मापण्याच्या काठीने दक्षिणभाग एकंदर पाचशे हात मापला.

19 त्याने पश्‍चिमेकडे वळून मापण्याच्या काठीने तो भाग एकंदर पाचशे हात मापला.

20 त्याने ते चार्‍ही बाजूंनी मापले; पवित्र स्थळे व सामान्य स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्याला सभोवार एक भिंत होती; तिची लांबी पाचशे हात व रुंदी पाचशे हात होती.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan