यहेज्केल 40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)संदेष्ट्याला मंदिराचा दृष्टान्त 1 आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे नगराचा विध्वंस झाल्यावर चौदाव्या वर्षी, वर्षारंभाच्या महिन्याच्या दशमीसच परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व त्याने मला तेथे नेले. 2 त्याने दिव्य दृष्टान्ताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशय उंच पर्वतावर ठेवले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते. 3 त्याने मला त्या जागी नेले तेव्हा एक पुरुष दिसला; त्याचे स्वरूप पितळेसारखे होते; त्याच्या हातात तागाची एक दोरी व मापण्याची काठी होती; तो वेशीनजीक उभा होता. 4 तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.” 5 मी पाहिले तर त्या मंदिराभोवती एक तट होता; त्या पुरुषाच्या हातात मापण्याची एक काठी होती; ती सहा हात लांबीची होती; हे माप एक हात व चार अंगुळे होते. त्याने त्या इमारतीच्या भिंतीची जाडी एक काठी व उंची एक काठी मापली. 6 तो पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे जाऊन पायर्या चढून वर गेला; त्याने द्वाराचा उंबरठा एक काठी रुंद मापला; हा पहिला उंबरठा एक काठी भरला. 7 प्रत्येक चौकी एक काठी लांब व एक काठी रुंद असून त्या चौक्यांमधील अंतर पाच हात होते; मंदिरासमोरील देवडीजवळच्या द्वाराचा उंबरठा एक काठी होता. 8 मंदिराकडल्या द्वाराची देवडी त्याने एक काठी मापली. 9 त्याने त्या द्वाराच्या देवडीचे माप घेतले ते आठ हात भरले; तिचे खांब दोन हात भरले; ही द्वाराची देवडी मंदिरासमोर होती. 10 पूर्वेकडील द्वाराच्या ह्या बाजूला व त्या बाजूला तीन-तीन चौक्या होत्या; त्या तिन्हींचे माप सारखेच असून दोन्ही बाजूंचे खांबही एकाच मापाचे होते. 11 त्याने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी दहा हात व द्वाराची लांबी तेरा हात मापली; 12 त्या चौक्यांच्या पुढची जागा एका बाजूला एक हात व दुसर्या बाजूला एक हात होती; त्या चौक्या दोन्ही बाजूंना सहा-सहा हात होत्या. 13 त्याने एका चौकीच्या छावणीपासून दुसरीच्या छावणीपर्यंत दाराला दार धरून पंचवीस हात रुंदी मापली. 14 त्याने देवडीचे माप घेतले; ते वीस हात भरले;1 त्या देवडीला2 लागून द्वाराभोवती अंगण होते. 15 प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या देवडीच्या पुढल्या भागापर्यंत पन्नास हात भरले. 16 त्या चौक्यांना व द्वारांच्या आतल्या बाजूंना त्यांच्या खांबांना झरोके होते; भिंतीच्या महिरपींनाही झरोके होते; असे आतल्या चोहोबाजूंना झरोके होते, व खांबांवर खजुरीची झाडे कोरलेली होती. 17 तेव्हा त्याने मला बाहेरील अंगणात नेले तेव्हा तेथे सभोवार खोल्या असून त्या अंगणात चिरेबंदी केली होती असे दृष्टीस पडले; ह्या चिरेबंदीवर तीस खोल्या होत्या. 18 ही चिरेबंदी म्हणजे अर्थात खालची चिरेबंदी द्वारांना लागून त्यांच्या लांबीइतकी होती. 19 तेव्हा त्याने खालच्या द्वारापुढून आतील अगंणापर्यंत रुंदी मोजली; ती पूर्व व उत्तर बाजूंना शंभर हात भरली. 20 मग त्याने बाहेरल्या अंगणाला लागून उत्तराभिमुख असलेल्या द्वाराची लांबीरुंदी मोजली. 21 त्यांच्या चौक्या ह्या बाजूला तीन व त्या बाजूला तीन होत्या; त्याचे खांब व महिरपी ही पहिल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होती; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. 22 त्याचे झरोके, महिरपी व कोरलेली खजुरीची झाडे ही पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होती; त्यावर चढून जाण्यासाठी सात पायर्या होत्या, व त्यांच्यासमोर त्याच्या महिरपी होत्या. 23 आतल्या अंगणात पूर्वेकडच्या द्वारासारखे उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते; एका द्वारापासून दुसर्या द्वारापर्यंत त्याने शंभर हात मापले. 24 मग त्याने मला दक्षिणभागी नेले, तेव्हा तेथे दक्षिणाभिमुख एक द्वार दृष्टीस पडले; त्याचे खांब व महिरपी त्याने मापल्या त्या पूर्वीच्या इतक्या भरल्या. 25 वर सांगितलेल्या झरोक्यांप्रमाणे ह्यांनाही सभोवार झरोके व महिरपी होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. 26 त्यावर चढून जाण्यास सात पायर्या होत्या व त्यांच्यासमोर त्याच्या महिरपी होत्या; व त्यांच्या खांबांवर अलीकडे-पलीकडे एकेक खजुरीचे झाड कोरले होते. 27 दक्षिणेकडे आतल्या अंगणाला द्वार होते; दक्षिणेकडल्या ह्या द्वारापासून त्या द्वारापर्यंत शंभर हात भरले. 28 तेव्हा त्याने मला दक्षिणद्वाराने आतल्या अंगणात नेऊन दक्षिणद्वार मापले, ते तितकेच भरले; 29 त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब व त्यांच्यावरील महिरपी ही मापली, ती तेवढीच भरली; त्याला व त्याभोवतालच्या महिरपींना झरोके होते; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात भरली. 30 त्याला सभोवार महिरपी होत्या; त्या एकंदर पंचवीस हात लांब व पाच हात रुंद होत्या. 31 त्याच्या महिरपी बाहेरल्या अंगणाच्या बाजूला होत्या; त्याच्या खांबांवर खजुरीची झाडे कोरली होती; त्यावर चढून जाण्यासाठी आठ पायर्या होत्या. 32 मग त्याने मला पूर्वेकडल्या आतील अंगणात नेऊन ते द्वार मापले, ते तेवढेच भरले. 33 त्याच्या चौक्या, खांब व महिरपी त्याने मापल्या, त्याही तेवढ्याच भरल्या; त्याला सभोवार झरोके व महिरपी होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. 34 त्याच्या महिरपी बाहेरील अंगणाच्या बाजूला होत्या; त्याच्या खांबांवर अलीकडे-पलीकडे खजुरीची झाडे कोरली होती; त्यावर चढून जाण्यास आठ पायर्या होत्या. 35 मग त्याने मला उत्तरद्वाराकडे नेले; तेही त्याने मापले व ते तितकेच भरले. 36 त्याच्या चौक्या, खांब व महिरपी त्याने मापल्या; त्याला सभोवार झरोके होते; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. 37 त्याचे खांब बाहेरील अंगणाच्या बाजूला होते; त्यांच्यावर अलीकडे-पलीकडे खजुरीची झाडे कोरली होती; त्यावर चढून जाण्यास आठ पायर्या होत्या. 38 द्वारांजवळ खांबांना लागून एकेक खोली असून तिला दार होते; तेथे होमबली धूत असत. 39 द्वाराच्या देवडीत होमार्पण, पापार्पण व दोषार्पण ह्यांचे पशू कापण्यासाठी ह्या बाजूला दोन व त्या बाजूला दोन अशी मेजे होती. 40 आणि बाहेरच्या अंगास, उत्तराभिमुख असलेल्या द्वाराच्या प्रवेशमार्गी चढून जाण्याच्या वाटेवर दोन मेजे होती; तसेच दुसर्या अंगास द्वाराच्या देवडीनजीक दोन मेजे होती. 41 द्वाराच्या बाहेरील अंगाला दोन्ही बाजूंना चार-चार मेजे होती; अशी यज्ञपशू कापण्यासाठी आठ मेजे होती. 42 होमार्पणासाठी ताशीव दगडांची चार मेजे होती; ती दीड हात लांब, दीड हात रुंद व एक हात उंच अशी होती; ज्या हत्यारांनी होमबली व इतर यज्ञपशू कापत ती त्यांच्यावर ठेवत असत. 43 चार अंगुले लांबीच्या आकड्या मंदिरात सभोवार लावलेल्या होत्या; यज्ञपशूचे मांस त्या मेजांवर ठेवत असत. 44 आतील द्वाराच्या बाहेर, आतील अंगणात दोन खोल्या होत्या, एक उत्तरद्वाराच्या बाजूस दक्षिणाभिमुख होती व दुसरी दक्षिणद्वाराच्या बाजूस उत्तराभिमुख होती. 45 तो मला म्हणाला, ही दक्षिणाभिमुख असलेली खोली ह्या मंदिराचे रक्षण करणार्या याजकांसाठी आहे. 46 आणि उत्तराभिमुख असलेली खोली वेदीचे रक्षण करणार्या याजकांसाठी आहे; ते सादोकाचे वंशज आहेत; ते लेवीच्या वंशातले असून परमेश्वरासमीप सेवा करण्यासाठी जातात. 47 त्याने अंगण मापले ते शंभर हात लांब व शंभर हात रुंद असे चौरस भरले; आणि मंदिरासमोर वेदी होती. 48 मग त्याने मला मंदिराच्या देवडीत नेले व त्या देवडीचा प्रत्येक खांब मापला तो एका बाजूने पाच हात व दुसर्या बाजूने पाच हात भरला; त्या द्वाराची रुंदी एका बाजूने तीन हात व दुसर्या बाजूने तीन हात भरली. 49 देवडीवर चढून जाण्यास पायर्या होत्या, त्या बाजूने तिची लांबी वीस हात व रुंदी अकरा1 हात भरली; त्या खांबांच्या एका बाजूला एक व दुसर्या बाजूला एक असे लहान खांब होते. |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India