Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


फारोचे व त्याच्या लोकांचे भवितव्य

1 अकराव्या वर्षी, तिसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की :

2 “मानवपुत्रा, मिसर देशाचा राजा फारो व त्याचा लोकसमूह ह्यांना विचार की, तू मोठेपणाने कोणासमान आहेस?

3 पाहा, अश्शूर हा लबानोनाचा एक गंधसरू असून त्याला सुंदर फांद्या फुटल्या, त्याची छाया गर्द झाली, तो उंच वाढून त्याचा शेंडा मेघमंडळास जाऊन भिडला.

4 पाण्याने त्याला पोसले, जलाशयाने त्याला वाढवले, त्यातून निघणारे प्रवाह लागवड केलेल्या सर्व मळ्यांत खेळत असत आणि त्याचे पाट वनातल्या सर्व झाडांना जाऊन पोहचत असत.

5 ह्यास्तव वनातल्या सर्व झाडांहून त्याची उंची मोठी झाली, पाण्याच्या विपुलतेने त्याला फार फांद्या फुटल्या व त्याच्या डाहळ्या लांबवर पसरल्या.

6 आकाशातील सर्व पाखरे त्याच्या फांद्याफांद्यांनी घरटी करीत. त्याच्या खांद्यांच्या आश्रयाने सर्व वनपशू पिले वीत, त्याच्या छायेखाली मोठीमोठी राष्ट्रे वस्ती करून राहत.

7 असा तो मोठा होऊन त्याला लांबलांब फांद्या फुटल्या म्हणून तो फार सुंदर दिसे, कारण त्याचे मूळ मोठ्या जलाशयांजवळ होते.

8 देवाच्या बागेतील देवदारूने त्याला झाकून टाकता येईना; सुरूच्या फांद्या त्याच्या तोडीच्या नव्हत्या; अर्मोनवृक्ष त्याच्या शाखांच्या तोडीचा नव्हता; देवाच्या बागेतील कोणतेही झाड त्याची बरोबरी करणारे नव्हते.

9 मी त्याला असंख्य फांद्या फुटू देऊन एवढे सुंदर केले होते की, देवाच्या एदेन बागेतली सर्व झाडे त्याचा हेवा करीत.

10 ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, त्याने आपणाला उंच केले आहे, आपल्या शेंड्याने त्याने मेघमंडळास भेदले आहे, तो उंच झाल्यामुळे त्याचे मन उन्मत्त झाले आहे;

11 म्हणून मी त्याला एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करीन; तो खातरीने त्याचा समाचार घेईल; त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे.

12 अन्य राष्ट्रांतल्या भयंकर परक्या लोकांनी त्याला छेदून टाकले व फेकून दिले : त्याच्या डाहळ्या पर्वतांवर व सर्व खोर्‍यांत पडल्या आहेत; देशातल्या सर्व नाल्यानाल्यांतून त्याच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे त्याच्या छायेतून गेली आहेत; त्यांनी त्याला सोडले आहे.

13 त्या पडलेल्या वृक्षांवर आकाशातील पाखरे जमतात, सर्व वनपशू त्यांच्या फांद्यांमध्ये येतात.

14 पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये; आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये, पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये म्हणून हे घडून आले आहे; कारण त्या सर्वांना मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवपुत्र जातात तिच्यात त्यांनाही जायला लावले आहे.

15 प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी तो अधोलोकी गेला त्या दिवशी मी विलाप करवला; त्याच्यासाठी मी जलनिधी झाकला, त्याचे प्रवाह बंद केले, महाजले रोखली; त्याच्यासाठी मी लबानोनास काळेठिक्कर केले. त्याच्यासाठी वनातले सर्व वृक्ष म्लानवदन झाले.

16 गर्तेत जाणार्‍याबरोबर मी त्याला अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांना थरथर कापवले; तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व वृक्ष, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे वृक्ष समाधान पावले.

17 राष्ट्रांपैकी त्याच्या छायेला बसणारे त्याचे साहाय्यकर्ते तेही त्याच्यासहित तलवारीने ठार केलेल्यांमध्ये अधोलोकी गेले.

18 तू वैभवाने व मोठेपणाने एदेनातल्या वृक्षांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनातल्या वृक्षांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमूह ह्यांची अशी गती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan