यहेज्केल 27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)सोर नगरीसाठी शोक 1 परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, 2 “मानवपुत्रा, सोरेसंबंधाने विलाप कर; 3 तिला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, “अगे सोरे, समुद्राच्या प्रवेशस्थानाजवळ वसलेले, बहुत द्वीपांच्या लोकांसाठी व्यापार चालवणारे; तू म्हणतेस, ‘मी सौंदर्याची खाण आहे.’ 4 तुझ्या सीमा समुद्राने वेष्टलेल्या आहेत; बांधणार्यांनी तुला सौंदर्यपूर्ण बनवले आहे. 5 त्यांनी सनीरच्या सरूंनी तुझी तक्तपोशी केली; तुझ्यासाठी डोलकाठी करावी म्हणून त्यांनी लबानोनाचे गंधसरू आणले. 6 त्यांनी तुझी वल्ही बाशानातील अल्लोनाच्या झाडांची केली; तुझ्या बैठकी कित्तीम द्वीपातल्या अश्शूरी (बाक्स) लाकडाच्या केल्या असून हस्तिदंताने जडलेल्या होत्या. 7 तुझे शीड मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार उत्तम तागाचे होते, तुला ते निशाणादाखल होते; तुझे छत एलीशा बेटातील निळ्या व जांभळ्या रंगांच्या कापडाचे होते. 8 सीदोन व अर्वद येथले रहिवासी तुझे वल्हेकरी असत. हे सोरे, तुझ्यात चतुर पुरुष होते, ते तुझे तांडेल असत. 9 गबालचे वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजांची फूटतूट दुरुस्त करत असत; समुद्रातील सर्व तारवे व त्यांचे नावाडी तुझ्या मालाची देवघेव करण्यासाठी तुझ्यात असत. 10 तुझ्या सैन्यात पारसी, लूदी व पूटी हे तुझे लढवय्ये असत; ते तुझ्यात आपल्या ढाली व शिरस्त्राणे टांगत; ते तुला तेजस्वी करीत. 11 अर्वदचे लोक तुझ्या सैन्यासह तुझ्या तटांवर सभोवार असत; तुझ्या बुरुजांवर शूर पुरुष असत; ते तुझ्या तटांवर चोहोकडे आपल्या ढाली टांगून तुला सौंदर्ययुक्त करत. 12 सर्व प्रकारचा माल तुझ्याजवळ विपुल असे म्हणून तार्शीश तुझ्याबरोबर व्यापार करी; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला रुपे, लोखंड, कथील व शिसे देत. 13 यावान, तुबाल व मेशेख हे तुझ्याबरोबर व्यापार करत; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला माणसे व पितळेची भांडी देत. 14 तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देत. 15 ददानी लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; अनेक द्वीपे तुझ्या व्यापाराच्या सोईची असत; ते तुझ्या मालाबद्दल तुला हस्तिदंती शिंगे व टेंबुरणीचे लाकूड (अबनूस) देत. 16 तुझे कारागिरीचे पदार्थ बहुविध असल्यामुळे अरामी लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; ते तुझ्या मालाबद्दल तुला पाचू, जांभळा रंग, तागाची वेलबुट्टीदार उत्तम वस्त्रे, प्रवाळ व माणके देत. 17 यहूदा व इस्राएल देशातले लोक तुझ्याबरोबर व्यापार करत; ते तुझ्या मालाबद्दल तुला मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल व ऊद देत. 18 तुझ्या कारागिरीचा माल विपुल असल्यामुळे व सर्व प्रकारचा माल तुझ्याजवळ मुबलक असल्यामुळे दिमिष्क तुझ्याबरोबर व्यापार करत असे व तुझ्या मालाबद्दल तो तुला हेल्बोनाचा द्राक्षारस व पांढरी लोकर देई. 19 ददान व यावान हे तुझा माल घेऊन तुला सूत देत; पोलाद, तज व अगरू ही तुझ्या व्यापाराच्या मालापैकी असत. 20 ददान तुझ्याबरोबर व्यापार करून तुला स्वारीचा साज पुरवत असे. 21 अरबस्तान व केदारचे सर्व सरदार व्यापारासंबंधाने तुझ्या मुठीतले असत; कोकरे, एडके व बोकड ह्यांचा ते तुझ्याबरोबर सौदा करत. 22 शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करीत; ते तुझा माल घेऊन तुला हरतर्हेचे उंची मसाले, जवाहीर व सोने देत. 23 हारान, कन्ने, एदेन, शबा, अश्शूर व किल्मद येथले व्यापारी तुझ्याबरोबर व्यापार करत. 24 ते तुझा माल घेऊन उत्तम वस्त्रे, जांभळे व वेलबुट्टीदार झगे, उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोर्या वगैरे व्यापाराच्या वस्तू तुला देत. 25 तार्शीशची गलबते तुझ्या मालाची ने-आण करणारे जणू काय काफलेच होते; भर समुद्रात तू फार समृद्ध व वैभवशाली झालीस. 26 तुझ्या वल्हेकर्यांनी तुला खोल पाण्यात नेले, पूर्वेच्या वार्याने तुला भर समुद्रात मोडून टाकले. 27 तुझे धन, तुझा माल, तुझे व्यापाराचे जिन्नस, तुझे नावाडी, तुझे खलाशी, तुझी फूटतूट दुरुस्त करणारे, तुझ्या मालाची देवघेव करणारे, तुझ्यातले सर्व लढवय्ये, तुझ्यात असलेले सगळे लोक तुझ्या पतनाच्या दिवशी भर समुद्रात पडले. 28 तुझ्या खलाशांनी मारलेल्या आरोळीच्या आवाजाने तुझ्या आसपासची जमीन हादरत आहे. 29 सर्व वल्हेकरी, खलाशी व समुद्रावर सफर करणारे सर्व नावाडी आपापल्या नावा सोडून किनार्यावर उभे राहत आहेत; 30 ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दुःखाने रडत आहेत; ते आपल्या डोक्यात धूळ घालत आहेत आणि धुळीत लोळत आहेत. 31 ते तुझ्यामुळे डोकी भादरून टाकून, कंबरेस गोणपाट गुंडाळत आहेत व मनात अति खिन्न होऊन तुझ्यासाठी मोठ्याने विलाप करीत आहेत. 32 ते शोकाकुल होऊन तुझ्याविषयी विलाप करून म्हणतात, ‘सोरेप्रमाणे, समुद्रात गडप झालेल्या सोरेप्रमाणे, कोणाची तरी दशा झाली आहे काय? 33 जलमार्गाने तुझा माल जात असे तेव्हा तू बहुत राष्ट्रांची चंगळ करीत असायचीस; तू आपल्या विपुल मालाने व मोठ्या सौद्याने जगातील राजांना सधन करीत असायचीस. 34 समुद्रलहरींनी तू खोल पाण्यात फुटलीस तेव्हा तुझा माल व तुझी सर्व मंडळी तुझ्याबरोबर बुडाली. 35 द्वीपांतले सर्व लोक तुला पाहून विस्मित झाले आहेत; त्यांचे राजे थरथर कापत आहेत; त्यांची तोंडे काळवंडली आहेत. 36 राष्ट्रांतले व्यापारी तुझा धिक्कार करतात; तुझी दशा पाहून लोकांना दहशत पडली आहे; तू कायमची नष्ट झाली आहेस.”’ |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India