Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


इस्राएलाच्या सरदारांसाठी विलाप

1 आता तू इस्राएलाच्या सरदारांसाठी विलाप कर,

2 आणि असे म्हण, ‘तुझी आई कोण? ती सिंहीण होती, ती सिंहांमध्ये वसत होती; तिने तरुण सिंहामध्ये आपल्या पेट्यांचे संगोपन केले.

3 तिने आपल्या पेट्यांपैकी एकाला वाढवले; तो वाढून तरुण सिंह झाला व शिकार करण्यास शिकला; तो माणसे भक्षू लागला.

4 राष्ट्रांनी त्याच्याविषयी ऐकले; त्यांनी केलेल्या खाचेत तो अडकून पडला; त्यांनी त्याला वेसण घालून मिसर देशात नेले.

5 आपली आशा भग्न होऊन नष्ट झाली हे तिने पाहिले तेव्हा तिने आपला दुसरा एक पेटा घेऊन त्याला वाढवले आणि तारुण्यावस्थेत आणले.

6 तो सिंहांमध्ये हिंडूफिरू लागला, तरुण सिंह झाला व शिकार करण्यास शिकला; तो माणसांना भक्षू लागला.

7 त्याने त्यांचे वाडे उद्ध्वस्त केले व त्यांची नगरे उजाड केली; त्याच्या गर्जनेच्या शब्दाने देश व त्यातील सर्वकाही वैराण बनले.

8 सभोवतालच्या निरनिराळ्या प्रांतांतील राष्ट्रे त्याच्यावर उठली; त्यांनी त्याच्यावर आपले जाळे टाकले; त्यांनी केलेल्या खाचेत तो अडकून पडला.

9 त्यांनी त्याला वेसण घालून पिंजर्‍यात कोंडले व बाबेलच्या राजाकडे नेले; इस्राएलाच्या डोंगरावर त्याचा शब्द पुन्हा ऐकू येऊ नये म्हणून त्याला दुर्गात टाकले.

10 तुझी आई तुझ्या द्राक्षमळ्यात जलाजवळ लावलेल्या द्राक्षवेलीसारखी होती; जलाच्या विपुलतेने ती सफळ होऊन तिला पुष्कळ पांगोरे फुटले.

11 अधिपतीची राजवेत्रे होण्याजोगे तिला मजबूत धुमारे आले; ती उंच वाढून तिने मेघांना भेदले व तिच्या बहुत शाखांसहित ती उंचीने मोठी दिसत होती.

12 तेव्हा तिच्यावर क्रोध होऊन तिला उपटून जमिनीवर पाडण्यात आले; पूर्वेकडील वार्‍यामुळे तिची फळे करपली; तिचे मजबूत धुमारे मोडून वाळून गेले; अग्नीने खाक केले.

13 आता तिला रानात रुक्ष व निर्जल प्रदेशात लावले आहे.

14 तिच्या शाखांतील धुमार्‍यातून अग्नी निघून त्याने तिची फळे खाऊन टाकली आहेत; आता अधिकार चालवण्याचा राजदंड होण्याजोगा तिच्यावर मजबूत धुमारा एकही राहिला नाही.’ हे विलापगीत आहे व विलापासाठी राहील.”

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan