Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहेज्केल 18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)


पाप करणारा जीवात्मा मरेल

1 परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,

2 “बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले, ही म्हण तुम्ही इस्राएल देशात वापरता ती का?

3 प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ही म्हण इस्राएलात ह्यापुढे तुम्हांला वापरायची नाही.

4 पाहा, सर्व जीव माझे आहेत, बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे, जो जीवात्मा पाप करतो तो मरेल.

5 नीतिमान मनुष्य कोण म्हणाल तर जो न्यायाने व नीतीने वागतो,

6 डोंगरावर भोजन करीत नाही, इस्राएल घराण्याच्या मूर्तीकडे डोळे लावत नाही, आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीला भ्रष्ट करीत नाही, ऋतुमती स्त्रीजवळ जात नाही,

7 कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,

8 वाढीदिढी करत नाही, व्याज घेत नाही, वाइटापासून आपला हात आवरतो, मनुष्यामनुष्यात सत्य निर्णय करतो,

9 माझ्या नियमांप्रमाणे चालतो, व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो, तोच नीतिमान होय; तो खातरीने वाचेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

10 तरीपण त्याला बलात्कारी व खुनशी पुत्र झाला, आणि बापाने ह्यांपैकी कोणतेही काम केले नसून पुत्राने त्यांतले एक जरी काम केले,

11 त्याने डोंगरावर भोजन केले, आपल्या शेजार्‍याची स्त्री भ्रष्ट केली,

12 लाचार व दुबळे ह्यांच्यावर जुलूम केला, कोणास लुटले, कर्जदाराचे गहाण त्याला परत केले नाही, मूर्तीकडे पाहिले, अमंगल कृत्य केले,

13 वाढीदिढी केली, व्याज घेतले, तर असला मनुष्य वाचेल काय? तो वाचायचा नाही; त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत; तो खातरीने मरेल; त्याने केलेला रक्तपात त्याच्यावरच उलटेल.

14 पुन्हा पाहा, त्याला असा मुलगा झाला की बाप जी पातके करतो ती तो पाहतो तरी ती पाहून तो स्वतः तशी करीत नाही,

15 तो डोंगरावर भोजन करत नाही, इस्राएल घराण्याच्या मूर्तीकडे पाहत नाही, आपल्या शेजार्‍याची स्त्री भ्रष्ट करीत नाही,

16 कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण अडकवून ठेवत नाही, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,

17 दीनाची हानी करण्यापासून आपला हात आवरतो, वाढीदिढी करत नाही, व्याज घेत नाही, माझे निर्णय पाळतो, माझ्या नियमांप्रमाणे चालतो, तो आपल्या बापाच्या अधर्मामुळे मरायचा नाही, तो खातरीने वाचेल.

18 त्याच्या बापाविषयी म्हणाल तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटले व आपल्या लोकांत अनाचार केला, म्हणून पाहा, तो आपल्या अधर्मामुळे मरेल.

19 तरी तुम्ही म्हणता, बापाच्या दुष्कर्माचा भार पुत्राने का वाहू नये? हे पाहा, मुलगा न्यायाने व नीतीने वागला, त्याने माझे सर्व नियम पाळून त्याप्रमाणे वर्तन केले तर तो खातरीने वाचेल.

20 जो जीवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही; नीतिमानाला त्याच्या नीतिमत्तेचे फळ मिळेल; दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल.


देवाचा मार्ग न्याय्य आहे
( यहे. 33:10-20 )

21 तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व न्यायाने वागला तर तो खातरीने वाचेल, मरायचा नाही.

22 त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत, त्याने केलेल्या नीतिमत्तेमुळे तो वाचेल.

23 प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे ह्याने मला संतोष होतो ना?

24 तरीपण नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करू लागला व दुष्टाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला, तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप ह्यामुळे तो मरेल.

25 तरी तुम्ही म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्याय्य नाही.’ हे इस्राएल घराण्या, ऐक; माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे काय?

26 कोणी नीतिमान आपली नीतिमत्ता सोडून दुष्कर्म करतो व त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो.

27 दुर्जन आपण केलेल्या दुष्टाईपासून परावृत्त होऊन न्यायाने व नीतिमत्तेने वागेल तर तो आपला जीव वाचवील.

28 तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खातरीने वाचेल, मरायचा नाही.

29 तथापि इस्राएल घराणे म्हणते, ‘प्रभूचा मार्ग न्याय्य नाही.’ हे इस्राएल घराण्या, माझे मार्ग न्याय्य नाहीत काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत असे नव्हे काय?

30 प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही.

31 तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या; आपल्या ठायी नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा; हे इस्राएल घराण्या, तुम्ही का मरता?

32 कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणार्‍याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही; तर मागे फिरा व जिवंत राहा.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan