यहेज्केल 15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)यरुशलेम जणू निरुपयोगी द्राक्षलता 1 परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, 2 “मानवपुत्रा, सर्व वृक्षांत द्राक्षलतेची काय श्रेष्ठता आहे? वनवृक्षांमध्ये जी द्राक्षांची फांदी होती ती काय अधिक आहे? 3 तिचे लाकूड कोणी कामास लावतो काय? भांडी टांगून ठेवण्यासाठी तिच्या खुंट्या बनवतात काय? 4 पाहा, ती अग्नीत सरपण म्हणून टाकतात; अग्नीने तिची दोन्ही टोके जाळली व मधला भाग भस्म झाला तर ती कोणत्या कामास येईल? 5 पाहा, ती शाबूत असता कसल्याही कामी पडत नाही, तर मग अग्नीने जळून तिचा कोळसा झाल्यावर ती कोणत्या कामी पडणार? 6 ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, मी वनवृक्षांतील द्राक्षलता अग्नीत सरपण म्हणून टाकतो त्याप्रमाणे यरुशलेमनिवाशांना अग्नीत टाकीन. 7 मी त्यांना विमुख होईन, ते अग्नीतून बाहेर पडले तरी अग्नी त्यांना खाऊन टाकील; मी त्यांना विमुख होईन, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे. 8 त्यांनी विश्वासघात केला आहे म्हणून मी देश वैराण करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.” |
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.
Bible Society of India