Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

निर्गम 4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा मोशेने उत्तर दिले, “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत. माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.”

2 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” तो म्हणाला, “काठी आहे.”

3 त्याने म्हटले, “ती जमिनीवर टाक.” ती त्याने टाकताच तिचा साप झाला; त्याला पाहून मोशे पळाला,

4 परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपला हात पुढे करून त्याचे शेपूट धर - त्याने हात पुढे करून ते धरले, तेव्हा त्या सापाची त्याच्या हातात काठी झाली;

5 “ह्यावरून ते विश्वास धरतील की त्यांच्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर ह्याचे तुला दर्शन झाले आहे.”

6 परमेश्वराने त्याला आणखी सांगितले, “आता आपला हात छातीवर ठेव.” त्याने हात छातीवर ठेवून बाजूला काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला.

7 मग त्याने त्याला सांगितले, “पुन्हा आपला हात छातीवर ठेव ” तेव्हा त्याने पुन्हा छातीवर हात ठेवला, आणि छातीवरून बाजूला काढला तेव्हा पूर्ववत तो त्याच्या शरीराच्या इतर भागांसारखा झाला.

8 “त्यांनी तुझा विश्वास धरला नाही व पहिल्या चिन्हाची सूचना मानली नाही तर ते ह्या दुसर्‍या चिन्हाची सूचना खरी मानतील.

9 पण जर त्यांनी ह्या दोन्ही चिन्हांवर विश्वास ठेवला नाही, तुझे ऐकले नाही, तर तू नदीचे पाणी घेऊन कोरड्या जमिनीवर ओत, म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.”

10 तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.”

11 तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्याला मुका, बहिरा, डोळस किंवा आंधळा कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?

12 तर आता जा, मी तुझ्या मुखास साहाय्य होईन आणि तू काय बोलायचे ते तुला शिकवीन.”

13 तेव्हा तो म्हणाला, “हे प्रभू, तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.”

14 मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला, तो त्याला म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ नाही काय? त्याला चांगले बोलता येते हे मला ठाऊक आहे. पाहा, तो तुला भेटायला येत आहे; तुला पाहून त्याला मनात आनंद होईल.

15 तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी त्याच्या व तुझ्या मुखाला साहाय्य होईन, आणि तुम्ही काय करायचे ते तुम्हांला शिकवीन.

16 तो तुझ्यातर्फे लोकांशी बोलेल; तो तुझे मुख होईल आणि तू त्याला देवाच्या ठिकाणी होशील.

17 तू आपल्या हातात ही काठी घे; हिने तू चिन्हे करून दाखवशील.”


मोशे मिसर देशास परत येतो

18 मग मोशे तेथून निघून आपला सासरा इथ्रो ह्याच्याकडे गेला व त्याला म्हणाला, “मला मिसरातल्या माझ्या भाऊबंदांकडे परत जाऊ द्या आणि ते अजून जिवंत आहेत किंवा नाहीत ते मला पाहू द्या.” तेव्हा इथ्रो मोशेला म्हणाला, “सुखाने जा.”

19 मिद्यान देशात परमेश्वर मोशेला म्हणाला, “चल, मिसर देशात परत जा; कारण तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यू पावले आहेत.”

20 मग मोशे आपली बायको व मुलगे ह्यांना गाढवावर बसवून मिसर देशास परत जायला निघाला. तो देवाची काठी आपल्या हातात घेऊन चालला.

21 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू मिसरास परत जाशील तेव्हा पाहा, ज्या अद्भुत कृती मी तुझ्या हाती ठेवल्या आहेत त्या सर्व फारोपुढे करून दाखव; तरी मी त्याचे मन कठीण करीन आणि तो माझ्या लोकांना जाऊ देणार नाही.

22 तू जाऊन फारोला सांग, ‘परमेश्वर म्हणतो, इस्राएल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे.

23 मी तुला सांगितले की, “माझ्या पुत्राला माझी सेवा करण्यास जाऊ दे”; पण तू त्याला जाऊ देण्याचे नाकारले, तर पाहा, मी तुझा पुत्र, तुझा ज्येष्ठ पुत्र जिवे मारीन.”’

24 मग मोशे प्रवास करीत असता उतारशाळेत असे झाले की परमेश्वराने त्याला गाठून जिवे मारायला पाहिले.

25 तेव्हा सिप्पोरा हिने एक धारेची गारगोटी घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली आणि ती मोशेच्या पायांजवळ ठेवून ती म्हणाली, “तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस.”

26 तेव्हा परमेश्वराने मोशेला पिडण्याचे सोडले. रक्ताने मिळवलेला नवरा असे तिने सुंतेला अनुलक्षून म्हटले.

27 मग परमेश्वर अहरोनाला म्हणाला, “मोशेला भेटण्यास तू रानात जा.” तो गेला आणि देवाच्या डोंगरावर त्याला भेटून त्याने त्याचे चुंबन घेतले.

28 मग परमेश्वराने त्याला जे काही सांगून पाठवले व जी चिन्हे करून दाखवण्याची आज्ञा केली ती सर्व मोशेने अहरोनाला सांगितली.

29 नंतर मोशे व अहरोन ह्यांनी जाऊन इस्राएलवंशाचे सर्व वडील जन जमवले;

30 आणि परमेश्वराने मोशेला जे काही सांगितले होते ते सर्व अहरोनाने लोकांना कळवले आणि त्यांना चिन्हे करून दाखवली.

31 तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.

Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र

Copyright © 2015 by The Bible Society of India

Used by permission. All rights reserved worldwide.

Bible Society of India
Lean sinn:



Sanasan